*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*
*🌹*संविधान दिन २६ नोव्हेंबर*🌹*
भारत ब्रिटीश राजवटीत असतांना १९३७ च्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका काँग्रेसने लढविल्यावर घटनासमितीची मागणी येऊ लागली. स्वतंत्र भारताची राज्यघटना वयस्क मतदारांनी निवडलेल्या घटनासमिती
मार्फतच व्हावी व ती ब्रिटिश सरकारने मान्य करावी, अशा आशयाचे ठराव निरनिराळ्या विधिमंडळांनी मंजूर केले. सर स्टॅफर्ड क्रिप्स हे १९४२ साली भारतात वाटाघाटीसाठी आले असता, या घटनासमितीला त्यांनीही संमती दर्शविली. पुढे दुसरे महायुद्ध संपल्यावर त्रिमंत्री योजनेद्वारा घटना समिति निर्मितीची प्रक्रिया जाहीर झाली.
त्याप्रमाणे प्रांतीय निवडणुका १९४६ मध्ये झाल्या. ब्रिटीश हिंन्दुस्थानचे २९५ व संस्थानचे ९६ अशी निवड झाली पण देशाची फाळणीच्या ठरावामुळे माउंटबॅटन योजनेप्रमाणे त्यात फेर बदल करावे लागले. मुस्लिम लीग ही काँग्रेसबरोबरच सहभागी होती पण फाळणीनंतर तिचा प्रभाव संपुष्टात आला.
फाळणीपूर्वी काँग्रेसला घटनासमितीमध्ये ६९% प्रतिनिधित्व होते, ते फाळणीनंतर ८२ % एवढे झाले. त्यामुळे काँग्रेस ठरवील तेच घटनासमिती मंजूर करणार असे ठरले. या समितीची बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाली. तरी प्रत्यक्ष काम करण्यास सुरूवात झाली, ती भारत स्वतंत्र झाल्यानंतरच. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने सार्वभौम सत्ता घटना समितीकडे आली आणि त्रिमंत्री योजनेतील निर्बंध नाहीसे झाले.
संविधान घटनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम भारत सरकारचे घटनाविषयक सल्लागार सर बी. एन्. राव यांनी केले. या आराखडयास अंतिम रूप देण्याचे काम ज्या मसुदासमितीकडे होते, त्या समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर होते व अल्लादी अय्यंगार, कन्हैयालाल मुन्शी आणि सय्यद मोहंमद सादुल्ला हे त्यांचे सभासद होते.
घटनासमितीच्या नेत्यांनी राष्ट्रीय हित डोळ्यापुढे ठेवून घटना निर्माण केली. केवळ ध्येयवादी दृष्टी न ठेवता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी प्रश्नांचा उलट-सुलट विचार केला. घटना बनवीत असताना हेच नेते सरकारचे नेते म्हणून दैनंदिन कारभार पहात होते. त्यामुळे व्यावहारिक अडचणींची जाण त्यांना होती. घटनासमितीपुढे निर्णय़ होण्यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यांची पक्षबैठक व तीमध्ये त्या प्रश्नांवर खुली चर्चा होऊन निर्णय होत असे. तोच निर्णय घटनासमिती मंजूर करी. यामुळेच घटनासमितीचे काम सुकर झाले, हे भीमराव आंबेडकरांनी मान्य केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर संस्थानिक स्वतंत्र झाले. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील गृह खात्याने त्यांचे स्थान निश्चित करून बरीच छोटीछोटी संस्थाने नजिकच्या प्रांतात सामील केली.
डिसेंबर १९४६ रोजी पहिली आणि शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी होऊन भारताचे प्रजासत्ताक गणराज्याचे संविधान अंतिम करण्यात आले.
या समितीने २९ ऑगस्ट १९४७ पासून सतत २ वर्ष ११ महिने १८ दिवस या कालावधीत अनेक चर्चासत्र,बैठका, सहविचार सभा आयोजित करून स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुता या मूलभूत हक्क व अधिकाराची जाण ठेवून लोककल्याण उददे्शाने संविधान तयार केले. २६ नोव्हेंबर हा दिवस भारतात “संविधान दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय देशाची राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती तयार करण्यात आली.
*संविधानची तत्वे:-*
“आम्ही, भारताची जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक (गण) राज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वांतत्र्य दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपण प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या द्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.”
*संविधानाची वैशिष्टये *
(१) संसदीय लोकशाही (२) मूलभूत अधिकार (३) सामाजिक न्याय (४) न्यायालयीन पुनर्विलोकन (५) संघराज्य पद्धती(६) मार्गदर्शक तत्त्वे. इत्यादी संविधानात फलद्रुप झाली.
२६ नोव्हेंबर या दिवशी संविधान देशाला सादर करण्यात आले. १९४९ ला हे मुलभूत हक्क व कर्तव्ये अबाधित ठेऊन देशाने संविधानाचा अंगीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ व संविधानची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान हे भारत देशाचे आहे. या संविधानचे
स्वाक्षरीकर्ते २८४ सदस्य आहेत.
देशातील सामान्य गरीब लोकांना संविधानाची ओळख व्हावी हा मूळ उद्देश संविधान दिन साजरा करण्याचा आहे. शाळा, महाविद्यालयातून संविधान प्रतिज्ञा वाचन केली जाते. अखंड सार्वभौम भारत एकसंघ रहाण्याची शपथ दिली जाते. भारतीय संविधान हे लाख मोलाचे मार्गदर्शन आहे. संपूर्ण भारतवर्ष या राज्यघटनेच्या लिखित नियमानुसार व कलमानुसार चालतो.
२६ जानेवारी १९५० पासून संविधान घटना अमलात आली आणि भारतीय प्रजासत्ताक (गणराज्य) जन्मास आले.
संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून हे अनमोल संविधान देशाला अर्पण केले आहे. देशातील जनतेचे कर्तव्य आहे कि या संविधानाचे महत्त्व ओळखून त्या संविधानाचा मान सन्मान व आदर करावा.
जय संविधान दिन.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717