You are currently viewing सहकारातून उद्योग सुरु झाल्यास रोजगाराची समस्या मिटेल – एम.के.गावडे

सहकारातून उद्योग सुरु झाल्यास रोजगाराची समस्या मिटेल – एम.के.गावडे

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार गुणात्मकदृष्ट्या उत्तम आहे. मात्र आता संख्यात्मक सहकार वाढण्याची आवश्यकता आहे. सहकारात काम करू इच्छिणा-या कार्यकर्त्यांनी सहकारी कायदा व व्यवस्थापन तसेच उपलब्ध संधीचा अभ्यास केल्यास निश्चित आर्थिक उन्नती होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्योग खात्याचे मंत्री असून जिल्ह्यातील शेतकरी महिला यांनी ठरविल्यास करोडो रुपयांची सबसिडी जिल्ह्यात येऊ शकते. व्यक्तिगत प्रकल्प उभा करणे जिल्ह्यात परवडणारे नाही मात्र सहकारी संस्थांच्या माध्यमातून आंबा, काजू, प्रक्रिया उद्योग, काथ्या अगरबत्ती यासारखे उद्योग सुरू झाल्यास रोजगार समस्या राहणार नाही. त्याचबरोबर आर्थिक उन्नतीची दालने उघडतील असे प्रतिपादन सहकार तज्ज्ञ एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

दि. १४ ते २० नोव्हेंबर या दरम्यान येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था याठिकाणी सहकार सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त १८ नोव्हेंबर रोजी सहकार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कुडाळ सहकारी संस्था सहाय्यक निबंधक उर्मिला यादव यांच्या हस्ते झाले.


यावेळी व्यासपिठावर पश्चिम महाराष्ट्र सहकार बोर्ड संचालक विलास ऐनापुरे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकार मंडळ अध्यक्ष गजानन सावंत, जिल्हा बँक माजी संचालिका प्रज्ञा परब, विजय रेडकर, प्रविणा खानोलकर, गीता परब, श्रुती रेडकर, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.


खरेदी विक्री संघ बिनविरोध केल्याबद्दल एम.के.गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विलास ऐनापुरे म्हणाले की, याठिकाणी असलेल्या काथ्याचा प्रकल्प एवढा भव्य आहे की, एम.के.गावडे पश्चिम महाराष्ट्रात असते तर अनेक सहकारी कारखाने निर्माण केले असते. कै. जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्याच पंचवार्षिक योजनेत सहकारासाठी आर्थिक तरतूद केली त्यानंतर कै. शिवरामभाऊ जाधव व कै.डी.बी.ढोलम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार विस्तारण्याचा भरपूर प्रयत्न केला. तरुणांनी व महिलांनी पुढे जाऊन सहकारात नवीन नवीन संधीचा लाभ घ्यावा व गावातील शेतकरी गरिबांना मदत करावी असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा