You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल…श्रीशब्द समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांचा जागतिक पुरुष दिन निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख.

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल…श्रीशब्द समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांचा जागतिक पुरुष दिन निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल…श्रीशब्द समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांचा जागतिक पुरुष दिन निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख.*

*पुरुष….*
*…दिन…..!*

पुरुष घराचा कणा असतो…
जबाबदारीचं ओझं घेऊनही
अगदी ताठ मानेने उभा असतो…

प्रत्येकाच्या तोंडी अनपेक्षितपणे अशी वाक्य सर्रास ऐकली जातात…काव्यमय पंक्तींमध्ये लय, ताल, सूर, यमक सर्वकाही साधून चपखल बसवली जातात…अगदी लालित्य भरलेलं सुंदर ललित लेखनही अलगद कागदावर उतरवलं जातं… आणि स्तुती करता करता मध्येच कुठेतरी, कोणीतरी लिहितं….
“….होय, तू पुरुष आहेस म्हणून… असं करतोस…तसं करतोस..” पुन्हा ही वाक्य वाचली की वाटतं… खरंच, सर्व पुरुष एका माळेचेच मणी आहेत का? पुरुष जातीवरच असा आरोप का होतो…?
स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर, अन्यायावर, सौंदर्यावर…येनकेन स्त्रियांच्या अनेक विषयांवर आजपर्यंत प्रत्येकजण लिहितो…परंतु कित्येकदा पुरुष मात्र दुर्लक्षित राहतो. आई…माऊली ही महान आहेच आणि आई हा विषय तर साहित्यात आपण अगदी घोळवून लिहिलेला पाहतो…परंतु, बाप या विषयावर नेमकंच लिहिलं जातं हे ही तितकंच खरं…!
पुरुषांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या भेदभावाबद्दल जागरूकता निर्माण करणे…असे उद्देश नजरेसमोर ठेऊन १९ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतीक महिला दिनाप्रमाणेच पुरुषांच्या कामगिरी आणि केलेल्या प्रगतीसाठी पुरुषदिन साजरा केला जाऊ लागला. पुरुषदिन साजरा करण्याचे व्यापक उद्दिष्ट म्हणजे मूलभूत मानवतावादी मूल्यांना प्रोत्साहित करणे, राष्ट्रामध्ये मुलांच्या, पुरुषांच्या कार्याचा उत्सव साजरा करणे. शाळा, महाविद्यालये, अनेक संस्थांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. व्याख्याने, वादविवाद, चर्चासत्र, पुरस्कार कार्यक्रम आदी प्रकारे पुरुषदिन साजरा केला जातो. पुरुषांसोबत होणारा भेदभाव, शोषण, होणारी हिंसा रोखून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी खरंतर हा दिवस साजरा केला जातो असं म्हटलं आहे.
तिन्हीसांजेला केविलवाणा अंधार झाल्यावर तो काळोख उजळून टाकणारा पुरुष प्रत्येकाला घरात हवा असतो…परंतु पुरुषप्रधान संस्कृती आहे असे म्हटले जाणाऱ्या देशात कधी पुरुषांच्या समस्यांवर चर्चा होताना दिसतच नाही. जागतीक आरोग्य संस्थेने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण जवळपास १६% आहे तिथे तरुण व पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण २५% पेक्षा जास्त आहे. बेरोजगारी १% जरी वाढली तरी पुरुष आत्महत्येचे प्रमाण ०.७९% वाढत असल्याचे समोर येत आहे.
“कुटुंबाचा आधार, पोशिंदा अशी बिरुदे लावलेल्या पुरुषांकडून सर्वांचीच खंबीरपणाची अपेक्षा असते. पुरुषांची जबाबदारी, कर्तव्ये यांची अगदी रंगवून चर्चा केली जाते… परंतु त्यांच्या अधिकाराची चर्चा होताना तेवढी दिसत नाही.
शर्टाचं बटन तुटलं म्हणून आरडाओरडा करणारा, आमटीला खमंग फोडणी पडली नाही तर नाराज होणारा…आपली माणसे मनासारखी वागली नाहीत म्हणून रागावणारा पुरुष सर्वानाच दिसतो…
परंतु, आपल्या देहाची वात करून कुटुंबासाठी सतत जळत राहणारा….सुखदुःखाच्या असंख्य सीमा ओलांडून जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून… धनुष्यासारखा वाकणारा….कोमेजल्या फुलांसारखा न उमलताच गळून पडणारा पुरुष कोणालाच दिसत नाही का…?
पुरुषांची होणारी चिडचिड…त्यांचा वाढणारा आवाज सर्वांच्या मनावर घाव घालतो, चर पाडतो… अन् आपल्या भावभावनांना अंतर्मनात कोंडून, स्वतःची स्वप्नं म्हणजे कुटुंब…ही खूणगाठ बांधून अव्यक्तपणे…निःशब्द होत सतत काळजी वाहणारा…नंदादीपाच्या मंद तेवणाऱ्या दिव्याप्रमाणे सतत प्रकाशमान असणारा पुरुष मात्र दुर्लक्षित राहतो…!
लाडीकपणे स्वतःच्या मुलीच्या मांडीवर डोकं ठेवताच…केसांतून हाताची नाजूक बोटं फिरल्यावर बाळ होऊन कुशीत शिरणारा पुरुष…!
बालपणापासून तारुण्यात…आई-वडिलांची स्वप्ने साकार करण्यासाठी दिवस रात्र संघर्ष करणारा पुरुष…!
वडिलांचे छत्र डोक्यावरून उतरताच कुटुंबाची दोरी आपल्या हाती धरणारा धैर्यशील पुरुष…!
भावा-बहिणींच्या सुखासाठी स्वतः बळी जाणारा पुरुष…!
पोटच्या पोराच्या भावी आयुष्याची काळजी आपल्या पापण्यांवर काजळासम लावून डोळ्यांची आग आग करून घेणारा पुरुष…!
आयुष्यातील क्षण नि क्षण आपल्या माणसांसाठी समर्पित करणारा पुरुष…!
समाजात समाजकंटकांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा पुरुष…!
स्त्रीवर होणारे अन्याय समोर आणतानाच समाजात तेवढाच महत्त्वाचा असणारा पुरुषवर्ग अनावधनाने का होईना आपल्याकडून डावलला तर जात नाही ना…..???
असा प्रश्न आजकाल उपस्थित होत आहे.
*मायेचा फुटता पाझर…*
*आनंदाश्रुंनी न्हाऊन जातो…*
*सुखदुःखांना गोठवुनी…*
*पखरण आनंदाची करतो…*
स्वकर्तृत्वाचे तेज आपल्या पुढील पिढीपर्यंत पोचविण्यासाठी सद्विचारांच्या निरंजनात कर्तव्याची वात लावून संस्कारांचे दिव्य तेल ओतून आयुष्यभर मंद मंद तेवत राहतो…तो पुरुष असतो…!
मनाच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या असंख्य सकारात्मक विचारांवर स्वार होऊन नकारात्मकतेला पायदळी तुडवत आयुष्याच्या शर्यतीमध्ये हिंमतीने भाग घेतो…तो पुरुष असतो…!
निर्भीडपणे घराचं, कुटुंबाचं सारथ्य करण्यासाठी… खरंच… प्रत्येक घरात एक पुरुष हवाच असतो….!

एक पुरुष हवा…
घराचा कणखर आधार…
उजळून टाकण्या घरातील
सांजवेळचा काळाकुट्ट अंधार…
एक पुरुष हवा…
सुखाची पखरण करणारा…
दुःखांना दूर सारून…
आयुष्यात आनंद भरणारा…
एक पुरुष हवा…
घराला घरपण देणारा…
मायेच्या भिंती उभारून…
उंबरा होऊन झिजणारा..
खरंच…
एक पुरुष हवा…!!!

©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 2 =