You are currently viewing सिंधुदुर्गात १० नोव्हेंबर पासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

सिंधुदुर्गात १० नोव्हेंबर पासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

विद्या शिरस; तालुकास्तरावर विविध प्रकारच्या ८३ स्पर्धा घेणार..

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत १० नोव्हेंबर पासून जिल्ह्यात विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर ,सांगली, सातारा, या जिल्ह्यातील १४, १७ व १९ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग सज्ज झाला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कार्यालयाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १० नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.
यामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, क्रिकेट, कुस्ती, तायक्वांडो, बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल या स्पर्धांचा समावेश असणार आहे तर या व्यतिरिक्त तालुकास्तरावर विविध ८३ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धा मुले व मुली अशा दोन गटात होणार असून या स्पर्धेचे नियोजन जिल्हा क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील जिम्नॅस्टिक स्पर्धांचा शुभारंभ १० नोव्हेंबर पासून होत असून १४ नोव्हेंबर पासून तालुका स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये आर्चरी, बॉक्सिंग, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, शूटिंग बॉल, बेसबॉल, बास्केटबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, हँडबॉल, सॉफ्टबॉल, जलतरण, वॉटर पोलो, कुस्ती, योगासन, सायकलिंग, जुदो, कराटे, बॉक्सिंग, आट्यापाट्या, रायफल शूटिंग, वेटलिफ्टिंग, जिम्नास्टिक अशा विविध प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्यात १० नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार असून जिल्हाभर क्रीडा उत्सवाचे स्वरूप येणार आहे.
याबाबतच्या नियोजनाची सर्व जय्यत तयारी जिल्हा क्रीडा विभागामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग सज्ज झाला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा