न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी (दि.९) पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे. लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मात्र, गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता.लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ ७४ दिवस काम करण्याची संधी मिळाली होती. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजुने निकाल दिला होता. आता न्या. चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून १३ मे २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते.
सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर याआधी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले होते की, त्यांच्या वडिलांचा सरन्यायाधीश म्हणून प्रदीर्घ कार्यकाळ जवळून पाहिला आहे. त्याच्या वडिलांचा काळ आणि सध्याच्या काळात काय फरक आहे? यावर बोलताना त्यांनी, फरक फक्त आधुनिक जीवनाच्या आणि समाजाच्या गुंतागुंतीच्या संदर्भात असल्याचे म्हटले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीत समतोल साधण्याचा प्रयत्न असेल. समाज अधिक गुंतागुंतीचा झाला आहे, असे न्या. चंद्रचूड यांनी नमूद केले होते.