You are currently viewing वर्दीतली स्त्री शक्ती…

वर्दीतली स्त्री शक्ती…

महिला पोलिस अधिकारी स्वाती यादव-बाबर..

“सद्क्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद जपत अविरतपणे जनतेसाठी सेवा बजावणारे खाकी वर्दीतली जनसेवक म्हणजे पोलीस…! जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारा पोलीस म्हणजे जनतेचा मित्रच. परंतु जनता आणि पोलीस यांच्यामध्ये पोलिसांप्रति असलेल्या भीतीमुळे नेहमीच एक अंतर पडत आलेले आहे. खाकी वर्दीतली माणूस कितीही जवळचा असला तरी त्याच्या अंगावर वर्दी चढली की माणसांच्या त्याच्या प्रतीच्या भावना बदलतात. परंतु त्यांच्या मध्येही माणुसकी असते, भावना असतात फक्त कर्तव्य पार पाडत असताना त्या वर्दीत दाखवायचा नसतात. सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव-बाबर या देखील कडक शिस्तीच्या असल्या तरी माणुसकी आणि भावना असलेल्या वर्दीतली स्त्री शक्ती आहेत.

लॉक डाऊन च्या काळात सावंतवाडीत आपल्या दबंग कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेल्या स्वाती यादव या आपल्या कर्तव्यात कधीही कसूर करत नाहीत. नियमबाह्य फिरणाऱ्यांना सावंतवाडीत त्यांनी उठाबशा सुद्धा काढायला लावल्या होत्या. परंतु त्याच कडक शिस्तीच्या उपनिरीक्षक स्वाती यादव गोवा येथून गाडीतून आरोपी घेऊन येत असताना तोरसे, गोवा येथे अपघातग्रस्त झालेल्या दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यात पडलेल्या असताना बघ्यांची गर्दी होऊनही कोणी मदत करत नसताना स्वतःच्या गाडीत आरोपी असतानाही गोवा येथे आपली गाडी माघारी नेत त्या दाम्पत्यास पार्से येथील शासकीय रुग्णालयातमध्ये दाखल करून पेडणे पोलिसांना त्याची माहिती देत आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले होते. जखमींच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसांचे आभार मानले तेव्हा उपस्थितांचे उर भरून आले होते आणि पोलिसांचा अभिमान वाटला होता.
“जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण” ही म्हण सार्थ ठरवत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत पोलीस खात्याची राज्यसेवा आयोगाची परीक्षा देत महिला अधिकारी पद भूषविले आहे. सुरुवातीला मुंबईत नोकरी केल्यानंतर त्यांनी रत्नागिरी येथे सेवा बजावली आहे. रत्नागिरी येथे जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षात कार्यरत असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ६ कर्मचाऱ्यांचे *दामिनी पथक* स्थापन करून धडाकेबाज कामगिरी करत पाच महिन्यात रोड रोमियो, कायदे मोडणाऱ्या ४६१ जणांवर दंडात्मक कारवाई केली होती. अल्पवयीन मुले, मुली प्रेमप्रकरणात अडकून पळून जाण्याचे प्रकार वाढत असल्याने दामिनी पथकाकडून मुले मुली फिरायला जाण्याची ठिकाणे, निर्जनस्थळी छापे टाकून अल्पवयीन मुले मुलींना ताब्यात घेऊन समुपदेशन करत पालकांच्या ताब्यात देत होते. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, परिसरात टवळांच्या टोळक्यांकडून मुलींना, बायकांना छेडछाडीचे, विनयभंगाचे प्रकार होतात ते रोखण्यासाठी सध्या वेशात राहून दामिनी पथकाकडून अशा टवाळ पोरांवर कारवाई केली जात असे. धूम स्टाईल मोटार चालविणे, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालविणे अशा गुन्ह्यात मुंबई मोटार वाहन अभियानांतर्गत मुलांना ताब्यात घेऊन पालकांवर व मुलांवर कारवाई केली जात असे. त्यामुळे स्वाती यादव यांचा रत्नागिरी मध्येही दबदबा होता.

पोलीस खात्यात सेवा बजावत असताना त्यांनी महिला दक्षता कक्ष, दामिनी पथक, महिला मुलींना समुपदेशन, अशा स्तरावर प्रभावीपणे काम केले आहे. विनयभंग, लैंगिक अत्याचार, पास्को इत्यादी गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत आरोपींना बेड्या ठोकण्यात त्यांना यश आले आहे. स्त्री स्वातंत्र्य व स्त्रियांचे अधिकार याबाबत त्या दक्ष आहेत. सेवा बजावताना अल्पवयीन मुलींकडे त्यांचा कटाक्ष असतो. पीडित मुलींना बऱ्याचवेळा मनोधैर्य योजनेचा लाभ देत त्यांनी अशा मुलींचे पुनर्वसन केले आहे.
आपल्या अतुलनीय कामांमुळे अल्पावधीतच सावंतवाडी सारख्या शहरात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे वर्दीतली स्त्रीशक्ती म्हणून सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव-बाबर यांच्याकडे अभिमानाने पाहिले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − three =