You are currently viewing कवी केशवसुत स्मृतिदिन ७ नोव्हेंबर

कवी केशवसुत स्मृतिदिन ७ नोव्हेंबर

*कवी केशवसुत स्मृतिदिन ७ नोव्हेंबर*

जन्म – १५ मार्च १८६६
स्मृती – ७ नोव्हेंबर १९०५ (हुबळी)

कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत. रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी जन्मलेले कवी केशवसुत हे मराठी कवितेतील आद्यकवी म्हणून ज्ञात आहेत. आधीच्या काळात संतकाव्य व पंतकाव्य हीच परंपरा होती, या परंपरेला मोडून केशवसुतांनी अन्य विषयांवर काव्यरचना लिहिल्या. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ठ पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितांना स्वच्छंद आणि मुक्त स्वरूपात केशवसुतांनी सर्वांसमोर आणले. कवी केशवसुत यांनी मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण दिले. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणाऱ्या कवी केशवसुतांनी आपल्या कवितांतून स्त्री पुरुषांमधील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. आपले क्रांतिकारक सामाजिक विचार व्यक्त करताना ‘एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ या ‘तुतारी (१८९३), ‘नवा शिपाई'(१८९८) ‘गोफण केली छान’ (१९०५) अशा कवितांमधून “सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले.
कवी केशवसुत यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्वे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि विशाल मानवतावाद. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’(१८९३), ‘म्हातारी'(१९०१), ‘हरपले श्रेय'(१९०५), या त्यांच्या गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी. इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. इंग्रजी कवितेतील “सॉनेट” हा काव्यप्रकार त्यांनी ‘सुनीत’ या नावाने प्रथमच मराठीत रूढ केला, शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही आणली. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे, आत्मलेखन उत्कट अनुभूतीचे असते असे सांगत स्फुटलेखन केले. केशवसुतांच्या कवितेत लालित्य कमी परंतु काहीशी राकट, रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्यपद्धतीशी सुसंगत ठरते. कवी केशवसुतांच्या काव्यात वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा फार मोठा प्रभाव होता.
गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी सारखे कवी आपल्याला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत. “तुतारी-मंडळ” या नावाने एक मंडळही स्थापन झाले होते. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधना नंतर ह.ना. आपटे यांनी प्रकाशित केला. केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’, ‘संध्याकाळ’, ‘स्फूर्ती’, ‘कवितेचे प्रयोजन’, ‘आम्ही कोण’ ‘मूर्तीभंजन’, ‘रांगोळी घालताना पाहून’ अशा एकापेक्षा एक सरस १३५ कविता आज उपलब्ध आहेत.
केशवसुतांचे शिक्षण खेड,बडोदा, वर्धा, नागपूर, पुणे इत्यादी ठिकाणी झाले.काहीकाळ त्यांनी मुंबईत हंगामी नोकऱ्या केल्या. त्यानंतर शिक्षक म्हणून त्यांनी सावंतवाडी, भडगावं, फैजपूर, धारवाड आदी ठिकाणी नोकरी केली. केशवसुतांचे ७ नोव्हेंबर १९०५ साली हुबळीला गेले असता प्लेगने निधन झाले

*आद्यकवी केशवसुत यांना भावपूर्ण आदरांजली !*

*संकलन*
【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

*सौजन्य: गूगल*

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 12 =