You are currently viewing एकमुखी दत्त मंदिरातील काकड आरतीने मालवण शहर भक्तिमय

एकमुखी दत्त मंदिरातील काकड आरतीने मालवण शहर भक्तिमय

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमुखी दत्त मंदिर म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात सद्या पहाटेच्यावेळी सुरू असलेल्या काकड आरतीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून पहाटेच्यावेळी होणाऱ्या या काकड आरतीने मालवणातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

आश्विन पौर्णिमेपासून जिल्ह्यातील काही ग्रामदेवतेच्या मंदिरात काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार ही काकड आरती केली जात आहे. मालवणात मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण तसेच भरड येथील श्री दत्त मंदिरात आणि मेढा येथील मुरलीधर मंदिर, गवंडीवाडा येथील राममंदिर, धुरीवाडा येथील खोत मठ व इतर काही मंदिरांमध्ये काकड आरती सुरु आहे. पहाटेला सर्वसाधारणपणे पाच वाजल्यापासून सुरु होणारी ही आरती दीड – दोन तास चालत आहे. यामध्ये भुपाळी, काकडा, भजन, आरती, देवतांना मंगलस्नान असे कार्यक्रम होत आहे.

मालवण भरड येथील दत्त मंदिर हे एकमुखी दत्ताचे मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दरवर्षी दत्त जयंती उत्सव, गणेशोत्सव, कार्तिकी स्नान उत्सव यासह कीर्तन पंचक, भजने, दशावतारी नाट्यप्रयोग असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात. या मंदिरातील कार्तिकी स्नान व काकड आरती उत्सवासही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यावर्षीही दि. ९ ऑक्टोबर पासून दत्त मंदिरात कार्तिकी स्नान व काकड आरती उत्सवास प्रारंभ झाला असून पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी कार्तिकी स्नान व आरतीला सुरुवात होते भाविकांचाही या काकड आरतीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसाची सुरुवात पहाटेच देवाच्या नामस्मरणाने होत असल्याने परिसरातील वातावरणही सुखद झाले आहे. दत्त मंदिरातील या काकड आरतीची सांगता मंगळवारी होत असून या निमित्ताने पालखी मिरवणूक ही निघणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा