You are currently viewing वेंगुर्ले रामघाट रोड येथे दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात

वेंगुर्ले रामघाट रोड येथे दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात

 तिघे गंभीर जखमी : गाड्यांचे नुकसान

वेंगुर्ले

वेंगुर्ले रामघाट रोड येथे आज सकाळी ११ .४५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात होऊन तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान तिन्ही दुचाकीस्वार यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्यात आले असून यातील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळस गिऱ्याचे गाळव येथील रहिवासी काशिनाथ भगवान सावंत (५५), निळकंठ नारायण सावंत (६९) व दशरथ दत्ताराम सावंत (६०) हे तिघे तुळस वडखोल येथील नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारावरुन (एमएच ०७ झेड ११३५) दुचाकीने तुळस येथे जात होते. तर शेती औषध निर्माता कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले रामराजा सुरेश लामकाने मूळ रा.विरवडे बुद्रुक, सध्या रा.मधला परबवाडा हे आपल्या ताब्यातील( एमएच ०७ एजी ७९०६) कारने अणसुर पाल येथून तुळस वेंगुर्ले रोडने परबवाडा येथे परतत असताना संबंधित दुचाकी एका स्विफ्ट गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना कारला समोरील भागास धडक बसून अपघात झाला.यावेळी दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. यातील दशरथ सावंत यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने गोवा बांबुळी येथे नेण्यात आले, तर दुसरी रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध न झाल्याने काशिनाथ सावंत व निळकंठ सावंत यांना वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी वेंगुर्ले पोलिस हवालदार भगवान चव्हाण, योगेश वेंगुर्लेकर, दादा परब व योगेश सराफदार यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.दरम्यान वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे अन्य दोन रुग्णांना गोवा बांबुळी येथे तब्बल दोन तास उलटून सुद्धा रुग्णवाहिका न मिळाल्याने येथे उपस्थित तुळस येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याठिकाणी दाखल करण्यात आलेल्या काशिनाथ सावंत यांना तात्काळ गोवा बांबुळी येथे हलवणे गरजेचे होते. मात्र उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध असताना त्याला चालक नसल्याने तब्बल दोन तास या रुग्णाची हेळसांड होत त्यांची तब्येत अधिक खालावली होती. यावेळी तुळस सरपंच शंकर घारे, माजी सभापती यशवंत परब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मकरंद परब, उपसरपंच जयवंत तुळसकर, तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या अपघाताची वेंगुर्ले पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 1 =