माविम आणि एन.आर.एल.एमच्या बचत गटांसाठी प्रशिक्षण द्या
– जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा 2022’ मधील विजेत्या स्पर्धकांच्या कल्पना जिल्ह्यासाठी फायदेशिर ठरणार आहेत. त्यासाठी त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि उत्पादनांच्या प्रचार- प्रसारासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने समन्वय साधून माविम आणि एन.आर.एल.एमच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करा,असे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा 2022’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये नारळ फोडणी यंत्र बनविलेल्या साहिल चव्हाटेकर याचा प्रथम क्रमांक आला. साहिल हा ओरोस आयटीआयचा विद्यार्थी असून त्याने कमीत कमी खर्चात उपलब्ध होणारे नारळ फोडणी यंत्र बनविले आहे. या यंत्रासाठी त्याचा संपर्क क्रमांक- 9623045380 असा आहे.
वैभववाडी आयटीआय मधील अमोल अशोक राणे यांनी स्वयंचलित पाणी टाकी नियंत्रक यंत्रणा बनवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अत्यंत कमी खर्चात आणि अवघ्या 12 होल्ट विजेवर चालणारे हे यंत्र प्रभावी ठरले आहे. या उत्पादनासाठी त्यांचा संपर्क क्रमांक 9422374300 असा आहे.
महात्मा गांधींचा ग्रामोद्योगचा संदेश घेवून स्यामंतक ट्रस्ट यांनी शाश्वत उपजिवीकेतून पर्यटन या संकल्पनेतून कोकणात होणाऱ्या फळांवर आधारीत प्रक्रीया उत्पादने सुरु केली आहेत.यामध्ये प्रामुख्याने आजगांवकर आजी, स्वयंम आणि स्वयंम यातून कोकम बटर, नारळाच्या करवंटीपासून कप, वाटी, रसाळ फणसापासून आईस्क्रीम अशा उत्पादनांची निर्मितीसह विक्री सुरु केली आहे. यांना तिसरा क्रमांक मिळाला असून या उत्पादनासाठी त्यांचा संपर्क क्र. 9404164945 असा आहे.
याव्यतीरिक्त जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून 4 थ्या व 5 व्या क्रमांकाला उत्तेजनार्थ एसएसपीएम अभियांत्रिक महाविद्यायाचे सहायक प्राध्यापक एकनाथ मांजरेकर यांनी एलपीजीचा वापर करुन शीतयंत्र निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक 9545890402 असा आहे. मालवणच्या टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थ्यीनी कस्तुरी तलवरे हिने सौर ऊर्जेवर चालणारे सागरी पर्यटक जीवरक्षक उपकरण निर्माण केले आहे. अत्यंत कमी खर्चात हे समुद्रात पर्यटकांना बुडण्यापासून सतर्क करणारे उपकरण असून सागरी गावांना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा निश्चित फायदा होणार आहे. तिचा संपर्क क्रमांक 9860905352 असा आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र जिल्हास्तरीय विजेत्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून पुढील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आज या पाचही विजेत्यांनी आपल्या उत्पादनाबाबत सादरीकरण करुन माहिती दिली. या पाचही जणांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, धनादेश व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे,प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्र.सहायक आयुक्त इनुजा शेख, महात्मा गांधी नॅशनल फेलोच्या शिवानी गरड, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी नितिन पिंडकुरवार उपस्थित होते.