You are currently viewing परतीच्या पावसामुळे आंबा व काजू पालवीवर कीड-रोग उद्रेकाची शक्यता पालवी संरक्षणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे आवाहन

परतीच्या पावसामुळे आंबा व काजू पालवीवर कीड-रोग उद्रेकाची शक्यता पालवी संरक्षणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे आवाहन

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भातशेती सोबतच आंबा व काजू या फळपिकांचेसुद्धा नुकसान होण्याची शक्यता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ यांनी व्यक्त केली. अवकाळी पाऊस ,ढगाळ वातावरण आणि वाढलेली आद्रता यामुळे आंबा व काजू पालवीवर कीड-रोग यांचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना पिकांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या आंबा बागांमध्ये कोवळी पालवी दिसून येत असून ढगाळ वातावरण कायम राहिल्यास पालवीवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, तरी या किडीच्या व्यवस्थापनासाठी पालवीवर डेल्टामेथ्रीन 2.8% प्रवाही 9 मिली किंवा तुडतुडे पिलावळ अवस्थेत असताना किटक वाढ अवरोधक बुप्रोफेझिन 25% प्रवाही 20 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. थंडीच्या दिवसात लिकॅनिसीलीयम लिकानी या बुरशीचा वापर 5 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे फुलकिडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नियंत्रणासाठी पालवी अवस्थेसाठी डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच ज्या ठिकाणी मिजमाशीचा प्रादुर्भाव झाला असेल तेथील प्रादुर्भावीत शेंडे खुडुन जाळून नष्ट करावेत. पुढील काही दिवसांमध्ये हवामान ढगाळ राहिल्यास व तापमानामध्ये घट झाल्यास पाऊस झालेल्या आंबा बागांमध्ये भुरी व करपा रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असून त्याकरिता पुढील उपाययोजना कराव्यात. भूरी रोगासाठी 5% हेक्झाकोनॅझोल 5 मिली. किंवा पाण्यात विरघळणारे 80 % गंधक २० ग्रॅम व करपा रोगासाठी कार्बेडॅमिन 12 टक्के + मॅंन्कोझेब 63 %10 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यातून फवारावे.

काजूमध्ये नवीन पालवीवर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून त्यासाठी नवीन पालवीची पाहणी करावी. पालवी काळपट आढळल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारसीनुसार लॅम्डा सायहॅलोथिन 6 मिली किंवा प्रोफेनोफॉस 10 मिली किंवा ॲसिटामिप्रिड 5 मिली प्रति 10 लीटर पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकांची फवारणी करावी. पाने पोखरणारी अळी व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी दढे ढेकण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक चालते,त्यामुळे इतर फवारणी टाळावी. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्‍ लोराइड 20 ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस 10 मिली किंवा ॲसिटामिप्रिड 5 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यातून यांची मिश्र फवारणी करावी. पावसाची तीन ते चार तासांची उघडीप दिसून आल्यास फवारणी करावी व फवारणीच्या द्रावणात स्टिकरचा वापर करावा जेणेकरून पावसामुळे कीटकनाशकांची मात्रा वाया जाणार नाही. शेतकऱ्यांनी उपरोक्त उपाययोजनेद्वारे आपल्या नवीन पालवी आलेल्या आंबा व काजू बागांचे संरक्षण करावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड -रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॉप) अंतर्गत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र ,वेंगुर्ला येथील डॉ.बलवंत सावंत, सहयोगी संशोधन संचालक तसेच कीटकशास्त्र विभागाचे डॉ. विजयकुमार देसाई, कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॉप प्रकल्प अन्वेषक व डॉ. गोपाळ गोळवणकर ,संशोधन सहयोगी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा