You are currently viewing शोध

शोध

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांनी सुप्रसिद्ध साहित्यिका शांता शेळके यांच्या कवितेचं केलेलं रसग्रहण*

सुप्रसिद्ध साहित्यिका शांताबाई शेळके यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांच्या एका कवितेचे रसग्रहण.

*” शोध “*

बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत
तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा
शोध लागत आहे मला
माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला !

माहीत नव्हते मला माझे बळ, माझी दुर्बलता,
सतत मला वेढून बसलेली माझी भीरुता
माझे माझ्याशी असलेले भांडण,
माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकीपण,
काहीच उमगत नव्हते यांतले
होते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले…

आता आतल्या आत मी आहे उलगडत,
क्षणोक्षणी विस्तार पावत,
पोहोचते आहे जाऊन
माझ्याच अंतरंगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत,

मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे,
दुखावत आहे आणि सुखावतही.

— शांता शेळके

-: रसग्रहण:-

कवयित्री शांताबाई शेळके यांची ‘शोध’ ही अतिशय सुंदर कविता आहे. या कवितेच्या शीर्षकावरून कोणतीतरी माहीत नसलेली गोष्ट समजणे, सापडणे, हुडकणे म्हणजेच तिचा शोध घेणे किंवा लागणे ही गोष्ट स्पष्ट होते. इथे एका स्त्रीमनाने स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेतला आहे. त्यामध्ये तिला जे आपल्या मनाचे दर्शन झाले त्याचे वर्णन समर्पक शब्दात खूप प्रभावीपणे कवयित्रीने मांडले आहे. यामध्ये ती स्त्री स्वतः तर अंतर्मुख होतेच पण वाचकही अंतर्मुख होतात. थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या मनाची अशीच अवस्था असते. भावना दाबून टाकून दडपणाखाली वावरणाऱ्या स्त्री मनाचे हे हुंकार आहेत.

*बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत*
*तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा*
*शोध लागत आहे मला*
*माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला !*
स्त्रीला संसारात, समाजात वावरताना अनेक जबाबदाऱ्या, कर्तव्यं, रूढी परंपरा, बंधने, मानमर्यादा स्त्रीसुलभ लज्जा अशा अनेक गोष्टीचे दडपण, अडथळे आड येत असतात, या सर्व गोष्टींना कवयित्री *’बाहेरचे प्रदेश’* असे म्हणते. वाढत्या वयाबरोबर काही जबाबदाऱ्या कमी होतात, ताणतणाव निवळतात, तिला थोडी स्थिरता येते. थोडक्यात हे ‘बाहेरचे प्रदेश’ संकुचित होत जातात. तिला जशी थोडी सवड मिळते तशी ती आपल्या अंतर्मनात डोकावते. असे पाहताना तिला आपल्या आतमध्ये असूनही इतके दिवस अज्ञात असलेले प्रदेश दिसू लागतात आणि तिच्या लक्षात येते की इतक्या दिवस तिची तीच स्वतःला किती अनोळखी होती ते. हे *’आतले प्रदेश’* म्हणजे तिच्या क्षमता, अपेक्षा, कुवत, धडाडी, विचारधारा, संकल्पना अशा विविध भावनांचे क्षेत्र.

*माहित नव्हते मला माझे बळ, माझी दुर्बलता,*
*सतत मला वेढून बसलेली माझी भीरूता*
*माझे माझ्याशी असलेले भांडण,*
*माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकीपण,*
*काहीच उमगत नव्हते यातले*
*होते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले…*
इतक्या दिवसात मला स्वतःला माझीच बलस्थाने, कर्तृत्व माहीत नव्हते. माझी दुर्बलता, माझ्या कमजोरी, सतत मला घेरून असणारी भीती या सगळ्या गोष्टींमुळे माझे माझ्याशीच होणारे भांडण, आजूबाजूला असंख्य माणसे, जिवलग आहेत तरीही मी एकटी आहे या गोष्टींची काही जाणीवच नव्हती. माहीत होती ती फक्त असंख्य जणांमध्ये, अगदी स्वतःच्या कुटुंबात असूनही एकटेपणाने होणारी घुसमट. फक्त ही घुसमट माझ्या जवळची होती.

*आता आतल्या आत मी आहे उलगडत,*
*क्षणोक्षणी विस्तार पावत,*
*पोहोचते आहे जाऊन*
*माझ्याच अंतरंगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत,*
आता विचार करेल तशी अगदी आतल्या आत असणारी मी मलाच उलगडते आहे. त्यामुळे माझे अस्तित्व क्षणोक्षणी विस्तारत आहे. या प्रवासात मी माझ्याच सर्व कानाकोपऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचत आहे. माझीच मला नव्याने ओळख होत आहे. माझ्या सर्व आवडीनिवडी, माझे सर्व कलागुण, मला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी, मला शिकायला, करायला आवडणाऱ्या गोष्टी अशा असंख्य गोष्टींची आत्ता जाणीव होत आहे.

*मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे*
*दुखावत आहे आणि सुखावतही.*
‘माझ्याच अंतर्मनाच्या या दर्शनाने आत्तापर्यंत या कोणत्याच गोष्टींची आपल्याला जाणीव कशी झाली नाही या विचाराने मी चकित झाले. त्यांच्या जाणीवेने अगदी स्तिमित झाले. इतरांमध्येच इतकी गुरफटून गेल्याने मी स्वतःकडे अजिबातच लक्ष दिले नाही. मी स्वतःवरच खूप अन्याय केला या गोष्टींमुळे मला खूप वाईट वाटते आहे. अशी अंतर्यामी दुखावतानाच मी सुखावले पण आहे. माझ्यातल्या कितीतरी चांगल्या गोष्टींचा, हव्याशा गोष्टींचा मला शोध लागला आहे. मी आता नव्याने माझ्या मनाप्रमाणे जगू शकेन. माझे व इतरांचेही जीवन आनंदी, सुखी करू शकेन.’
कवयित्रीने अतिशय समर्पकपणे प्रत्येक स्त्रीला स्वतःला ओळखण्याचे महत्व समजावून सांगितले आहे. अधून मधून असा ‘आपुलाची वाद आपणाशी’ असा स्वतःशी वाद-संवाद झाला पाहिजे म्हणजेच आपण आपली योग्य काळजी घेत आपल्या सर्व भावनांना योग्य न्याय देऊ शकू. सकारात्मक संदेश देणारी ही खूप सुंदर कविता आहे.

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.५८

Advertisement

 

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा