You are currently viewing इथे “लॉस-व्हेगास” नकोय…

इथे “लॉस-व्हेगास” नकोय…

इथे “लॉस-व्हेगास” नकोय

सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वतःची धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कृती जपणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता. “होता” असे म्हणणे खरे तर दुर्दैवी आहे, पण अतिशय खेदाने ते म्हणावे लागते आहे. कदाचीत, अजूनही वेळ आहे की तो पूर्ववत स्थितीला आणता येईल. पण घरात हातावर हात घेऊन बसलो तर त्या हाती धुपाटणे सोडून काहीही येणार नाही.

आपण राजकारण आणि राजकारणी यांना सतत शिव्या घालण्यात व हेटाळणी करण्यात फार धन्यता मानतो. राजकारणापासून दूर असलो तरच आपण “चांगले” आहोत असा आपलाच आपण समज करून घेत असतो. भले आपल्याला हे माहीत नसते असे नाही की लोकशाहीत सत्ता आणि ताकद याचा मार्ग राजकारणातुनच जातो, त्याला पर्यायही नसतो.

पण आपल्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हे सूत्र अनधिकृत धंदेवाले ओळखतात आणि ते अंमलातदेखील आणतात. अनधिकृत धंद्याला संरक्षण कवच म्हणून ते सत्तेला चिकटून प्रशासकीय यंत्रणेवर पकड ठेवत असतात. राजकीय पक्ष आणि तत्व यांच्याशी त्यांना फारसे काही देणेघेणे नसते. याच त्यांच्या धोरणाला आपणही “राजकारण” म्हणून मान्यता देतो, आपण या क्षेत्रापासुन अधिक अलिप्त होतो आणि राजकारणातुन समाजकारणाचाही चिखल करून टाकायला मदत करतो. आपली अलिप्तता या लोकांच्या अधिकच पथ्यावर पडते. आपण सारेच शिवशंकर या मागच्या लेखात मी आपल्या या ध्यानात घुसण्याच्या प्रकारावर बोललोच आहे. पण शिवशंकराकडे भोळेपणा असला, तरी त्याचे ध्यान हे संयमातून आलेले असते आणि वेळ येताच तांडव करून, तिसरा डोळा उघडून परिस्थिती कधीही बदलण्याची हिंमत व सामर्थ्य शिवशंकराच्या ठायी असते. तसे ते आपल्याही ठायी असते, पण…. तिसरा डोळा आपण कधी उघडणार आहोत की नाही, एवढाच प्रश्न कायमच प्रश्नचिन्ह समोर वागवत आलेला आहे.

अलीकडच्या काळात सिंधुदुर्गची भजन कीर्तन संस्कृती बदलून नवी विकास-संस्कृती तिथे जन्माला येत आहे. पण महानगरे वाढत जाताना जशी वेडीवाकडी आकार घेतात, तसेच या नवीन संस्कृतीचे झाले आहे.

हे का झाले, कसे झाले अशा प्रश्नांची कितीतरी उत्तरे निघतील. पण ही उत्तरे सोडवण्यापेक्षा आता हा अभ्यासक्रमच बदलून टाकण्याची नितांत गरज आहे.

नवीन अभ्यासक्रमासाठी सगळ्या स्तरावर वेगळ्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. खरं तर राजकीय स्तरावर अधिकच प्रामाणिकपणे विचार व्हायची गरज आहे. गेल्या काही वर्षात रोजगाराची समर्थ दिशा देणारा कोणताही प्रकल्प इथे आलेला नाही. आज वास्तव हेच आहे, की अवैध वाळू धंद्यापाठी टिपर बनत रात्र रात्र रस्त्यावर सेटिंग लावत फिरणे, दारू वाहतूक करणे, मटका बुकिंग घेणे, आणखीही असे खूप काही अवैध धंदे हेच मोठ्या प्रमाणावर रोजगाराचे साधन बनले आहेत. या धंद्यावर राजकीय नेते वर्चस्व घेऊन बसले आहेत आणि हे धंदेवाले राजकीय कवच मिळवू पहात आहेत. या सगळ्यात मताची आणि निवडणूकीच्या अर्थकारणाची सोय पाहिली जाणार असेल, तर नक्कीच ते भयानक आहे. शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. इथे या भ्रष्ट बीजपोटी भविष्यात जी फळे मिळणार आहेत, ती कशी असतील या विषाची परीक्षा पाहण्याचा मूर्खपणा आजच टाळता आला तर उत्तमच आहे. ही संतसज्जनांचा वारसा लाभलेली पुण्यभूमी आहे, चांगल्या संकल्पाला नक्कीच बळ देईल. सिंधुदुर्गात आपल्याला पुढच्या पिढीचे भविष्य जपणारा “शाश्वत विकास” हवा आहे, पिढी भरकटवत अखेर बरबाद करणारा झगमगीत “लॉस व्हेगास” अजिबात नकोय! युवा पिढीचे भवितव्य डावाला लागलेला हा जुगार आता थांबायलाच हवा. त्यासाठी गांधारीसारखी आपणच आपल्या डोळ्याला बांधून घेतलेली पट्टी सोडून वर्तमान आणि भविष्याकडे एकदा डोळसपणे पाहण्याची हिंमत करायला पाहिजे! तीसुद्धा, आज आणि आजच!!

अविनाश पराडकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − nine =