You are currently viewing तुतारी कट्ट्यावर रंगली ‘काव्यमय कोजागरी’

तुतारी कट्ट्यावर रंगली ‘काव्यमय कोजागरी’

कोमसाप टीमच्या सादरीकरणाने भरले रंग

सावंतवाडी

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त सावंतवाडीच्या मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या तुतारी कट्ट्यावर काव्यमय सादरीकरणातून कोजागरी साजरी करण्यात आली.

येथील कोमसाप शाखेच्या वतीने कोजागरी पौर्णिमा निमित्त आयोजित केलेल्या काव्यरंग कार्यक्रमादरम्यान अनेक कवींनी आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले. यात प्रारंभी कवयित्री मंगल नाईक – जोशी यांनी कोजागरी पौर्णिमेचे अध्यात्मिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्व काव्यमय पद्धतीने सादर केले. त्यानंतर कवी दीपक पटेकर यांनी आपल्या कवितेतून कोजागरी पौर्णिमेचा जागर विशद केला. मेघना राऊळ यांनी उत्कृष्टरित्या भावगीत सादर केले तर कोमसापच्या सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या गीत गायनातून रसिकांची मने जिंकली. ज्येष्ठ सदस्य प्रा. ॲड. अरुण पणदूरकर यांनी जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या कार्याविषयी माहिती देत आपली कविता सादर केली. प्रा. रुपेश पाटील यांनीही आजच्या परिस्थितीवर आधारित कविता गायन केले. शिक्षक संतोष पवार यांनीही बालकविता सादर केली. प्रज्ञा मातोंडकर, विनायक गांवस यांनीही आपल्या कवितेतून कोजागरी काव्य संमेलनात रंग भरले. ज्येष्ठ सदस्य राजू तावडे यांनी आपल्या विनोदी शैलीने गजाली सादर करत उपस्थितांना चांगलेच हसवले. कोमसापचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर यांनी अखिल भारतीय ग्राहक मंच विषयी माहिती दिली. तर कोमसाप सावंतवाडी तालुका अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनीही उपस्थितांचे आभार मानत कोजागरी कविता सादर केली. शेवटी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानत आगामी काळातील कोमसापच्या वाटचालीसाठी काही उपक्रम सूचविले. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले. कार्यक्रमास केंद्र प्रमुख म. ल. देसाई, प्राथमिक शिक्षक गणेश घाडी यांचीही उपस्थिती लाभली.

प्रतिक्रिया व्यक्त करा