नारायण राणे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेलं नाव, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात कायम अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे नारायण राणे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने विकास काय असतो हे राणेंच्या नेतृत्वातून पाहिलं आहे. मंत्रीपदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. परंतु त्यांच्या या प्रवासात त्यांच्यासोबत जे राहिले ते कार्यकर्ते देखील मोठे झाले. किंबहुना नारायण राणेंनी अनेक कार्यकर्ते घडवले, त्यातून कित्येकजण उद्योगपती, नेते झाले.
नारायण राणे यांच्या सोबत चिकाटीने, प्रामाणिकपणे राहिलेले अनेकजण त्यांच्या पदस्पर्शाने मोठे नेते झाले. काहीजण जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, सभापती, अगदी आमदार सुद्धा झाले. राणेंनी कार्यकर्त्यांना राजकारणातच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर उभे केले. राणेंच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आलिशान गाड्यातून फिरू लागले, करोडोंच्या बंगल्यात राहायला गेले.
ज्यांच्याकडे काहीच नव्हते ते नारायण राणे यांच्यासोबत आल्याने धनिक झाले, परंतु अलीकडेच सावंतवाडी शहराचे भाजपा मंडलचे अध्यक्ष झालेले अजय गोंदावळे हे मात्र मुळातच आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. हॉटेल, बिल्डर्स असे उधोग असल्याने त्यांना उद्योजक म्हणून ओळखले जाते. आलिशान बीएमडब्ल्यू गाडीतून फिरणारे अजय गोंदावळे भाजपा मध्ये गेले, नारायण राणे यांच्या जवळ आले आणि अल्पावधीतच शहराध्यक्ष झाले.
अनेक व्यावसायिक, उद्योगपती आपल्या व्यवसायाला स्थिरता येण्यासाठी, राजकीय आश्रय मिळविण्यासाठी अलीकडे राजकारणात प्रवेशकर्ते होताना दिसत आहे. आणि राजकीय पक्षांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम कार्यकर्त्यांची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे उद्योगपती आणि राजकारण यांची नाती बऱ्याच प्रमाणात अधिक घट्ट होताना दिसतात. अशा व्यावसायिकांना एखाद्या पक्षाचं राजकीय पद मिळालं की ते राजकीयदृष्ट्या सुरक्षित होतात.
नारायण राणे यांच्याच आशिर्वादाने सावंतवाडी सारख्या शांत, सुसंस्कृत शहराची धुरा तरुण तडफदार नेतृत्व असलेले अजय गोंदावळे यांच्या हाती दिले आहे. भविष्यात सावंतवाडी शहरात अजय गोंदावळे नक्कीच आपल्या कुशल नेतृत्वाने भाजपाला ‘अच्छे दिन’ आणतील याबद्दल तिळमात्र शंका नाही.