You are currently viewing गजरा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

गजरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक…श्रीशब्द समूह समन्वयक लेखक कवी दीपक पटेकर लिखीत अप्रतिम ललीतलेख*

*गजरा*

तू माळलेला…
गजरा मोगऱ्याचा…
सुवास तो फुलांचा…
वेडावतो मनाला…

नाजूक, कोमल, शुभ्र गंधाळलेला मोगरा…टिपूर चांदण्यांसारख्या…लुकलुणाऱ्या मोहक, रूपवान सुगंधी जाई जुई… रंग रूप तद्वत असले तरीही लज्जेने चुरचुर होणारी…गालातल्या गालात खळी पाडून हसणारी पण अबोल… अबोली… भगवे वस्त्र परिधान करत अंगावर मोत्यांसारखे उपरणे घेऊन जणू पावित्र्याची जपणूक करते… आपल्या मोहक सुगंधाने सर्वांनाच वेड लावून…गंधित करणारी…मादक रूप अन् मोहक, देखणी सुरंगी…सारीच फुले गजऱ्यात विणल्यावर सौंदर्याची लयलूट करतात…सुगंधाने भारावून, वेडावून सोडतात…
सांजवेळेस नाजूक कोमल कळ्या काढताना त्या मिटल्या पाकळ्यांतील गंध कळी सुद्धा कुणाला कळू देत नाही…नुकतंच वयात येत असलेलं आपलं सौंदर्य…सुडौल बांधा, मोहक रूप जपताना आपल्या उमलण्याची कुणाला जाणीव होऊ नये म्हणून कळी देखील चेहरा लपवून फिरणाऱ्या यौवणात आलेल्या युवतीसारखी पाकळ्यांमध्ये गंध दडवून ठेवते… दोऱ्याच्या एका एका फेऱ्यात विणले जात असताना कळी आपलं अस्तित्व वेगळं जपते जणू दुसऱ्या कुणाच्या अंगाचा स्पर्श देखील होऊ नये….भले कळी दूर दूर राहिली तरी फुल मात्र जमलताच दाटी दाटीने राहते…एकमेकांची संगत करत फुलते…बहरते…मोहरते…सुगंधाची लयलूट करतं….आपल्या रूपाने गंधाने प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षून घेतं…दोऱ्यात विणलेल्या फुलांच्या गजऱ्याकडे कुणीही सहज आकर्षित होतं… फुलांच्या गजऱ्याचा गंध दीर्घ श्वास घेत सर्वांगात भिनवून घेतात…
काळ्या रेशमी केसांच्या बटांवर…रविने सांडले रंग सोनेरी.. कुंतल काळे जणू भासले…साडीची मज किनार भरजरी…नाजूक कोमल शुभ्र फुलांचा…गजरा शोभे अप्सरा भूवरी…
सूर्याची सोनेरी किरणे काळ्या रेशमी केसांवर पडताच लांब सडक वेणीवर खेळणारा गजरा भलताच ऐटीत असतो…आपल्याच मस्तीत कधी वर तर कधी खाली येतो…डुलतो… अन् आपल्या सुगंधाने रेशमी केसांनाही सुगंधित करून सोडतो… केसात माळलेला गजरा तिला आरशाकडे घेऊन जातो… अन् आरशात पाहताच ललनेला जणू लाजवतोच…तिचेच रूप तिला नव्याने दाखवतो…खुललेलं… बहरलेलं…लाजेने चुरचुर झालेलं…! सण असो वा सोहळा…गजरा स्त्रीचं सौंदर्य खुलवतो… पाठीवर रुळणाऱ्या नाजूक रेशमी केसांमध्ये जाई जुईचा गजरा असा खुलतो जणू रात्रीच्या गर्द काळोखात चांदणे फुलून यावे… अन् आपल्या अस्तित्वाने आसमंताने बहरून जावे…अगदी तसाच थाट असतो युवतीच्या केसांमध्ये भुरळ पाडणाऱ्या जाई, जुईच्या गजऱ्याचा…केसांच्या अंबाड्यातील सुरंगी तर वेड लावते… तिचे मोहक रूप अन् मादक सौंदर्य म्हणजे नखशिखांत नटलेल्या…आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या…सोनेरी किनार असलेली भरजरी भगवी शालू नेसून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेणाऱ्या नव्या नवरीसारखे असते…
मोहक, रूपवान, गोरा नसला तरी नाजूक साजूक पण तरीही अबोल अबोलीच्या गजऱ्याचा मंद सुवास अन् सण सोहळ्यातील उपस्थिती लक्ष वेधून घेते…लग्नात अबोलीच्या गुणांचे कौतुक होते….तिच्या केसांतील उपस्थितीने स्त्रीचे सौंदर्य खुलून जाते…मोगऱ्याचा साथीने अबोलीचे असणे म्हणजे तारकांच्या समूहात लुकलुणाऱ्या ग्रहांनी चमकावे तसेच भासते…विलक्षण विलोभनीय…!!
स्त्रियांचे आवडीचे सण… सोहळे आणि गजरा यांचं वेगळंच नातं आहे… केसांच्या वेणीत, अंबाड्यात अगदी अलीकडेच पाठोवर हळुवार मोकळे सोडलेल्या केसांतही मोगरा, सुरंगी, जाई, जुईचे गजरे भाव खाऊन जातात…
राग तुझ्या ना मनी उरावा
गंध प्रीतीचा तिथे रहावा
नाजूक कोमल गजऱ्याचा
मोह तुला तो सदा असावा
रुसवा, नाराजी, राग सहजच जातो विरून… हातात पाहता पतीच्या गजरा सुगंधी दुरून….!
कितीही राग, रुसवा असला तरी पतीने प्रेमाने आणलेला गजरा पाहताच पत्नीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो… गालावर गुलाबी गुलाबी लाली येते… ओठांवर मंद हास्य विलसते… लज्जेने ती हळूच शहारते… स्पर्श त्याचा होताची वळते…मिठीत तयाच्या हरवून जाते…गजऱ्याचा सुगंध नात्यात माळते…!!

©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा