You are currently viewing अज्ञात गाडी चालकाकडून विद्यार्थ्याला कुरकुरे देण्याचा प्रकार

अज्ञात गाडी चालकाकडून विद्यार्थ्याला कुरकुरे देण्याचा प्रकार

मुले पळविणा-या टोळीचा तपास करण्याची शिवसेनेकडून मागणी

वेंगुर्ला

शाळेमधून घरी जाणा-या विद्यार्थ्याला अज्ञात गाडी चालकाने कुरकुरे देतो असे सांगित्यावर त्या विद्यार्थ्यांने घाबरुन पळून जात घडलेला प्रकार पालकांच्या कानी घातला. दरम्यान, त्याच ठिकाणी पालक व ग्रामस्थ यायच्या आत तो अज्ञात वाहनचालक निसटला. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यामध्ये अजूनही मुले पळविणारी टोळी फिरत असून त्याबाबत जलद गतीने तपास करावा अन्यथा शिवसेना वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे लेखी निवेदन शिवसेनेच्यावतीने पोलिसांना देण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये शालेय मुलांना अज्ञात वाहनचालकांकडून प्रसाद तसेच चॉकलेट देण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुलांना पळविणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर त्यावर पडदा पडला होता. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एक अशीच घटना घडल्याने मुलांना पळविणारी टळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. होडावडा व वजराट गावालगत असणा-या बसस्टॉपजवळ दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शाळेमधून घरी जाणा-या विद्यार्थ्याला एका अज्ञात गाडी चालकाने कुरकुरे देतो असे सांगितले. मात्र, घाबरलेल्या मुलाने कुरकुरे न घेता तेथून पळ काढत घडलेला प्रकार आपल्या पालकांना व ग्रामस्थांना सांगितला. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी आलेल्या पालकांना व ग्रामस्थांना अज्ञात गाडी चालक आढळून आला नाही. त्याच्याकडे विना नंबरची गाडी असल्याचीही माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच घडत असणा-या या प्रकारावरुन मुले पळविणारी टोळी तालुक्यात फिरत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. याबाबत वेंगुर्ला शिवसेनेने तात्काळ वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट घेऊन घडलेला प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. तसेच विना नंबर व बिन ओळखीच्या गाड्यांची कसून चौकशी व्हावी, ज्या ठिकाणी शाळा आहत अशा परिसरामध्ये पोलिसांची गस्त ठेवावी, अशा वारंवार घडणा-या घटनेचा तात्काळ तपास करावा अशी मागणी शिवसेनेने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तपासाची त्वरित कार्यवाही न झाल्यास वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही ईशारा दिला आहे.

यावेळी वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, वायंगणी सरपंच सुमन कामत, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनिल डुबळे यांच्यासह उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, विवेक आरोलकर व अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 19 =