सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा समादेशक होमगार्ड भवन व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन…
सिंधुदुर्गनगरी
कोविड सारख्या परिस्थितीत सिंधुदुर्गातील गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून केलेले काम न विसरता येणारे आहे. त्यांच्या या कार्याचा भविष्यात निश्चितच सन्मान केला जाईल, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिलेल्या जिल्ह्याच्या जिल्हा होमगार्ड समादेशक कार्यालयाचे लोकार्पण माझ्या हस्ते होत आहे, याचा मला अभिमान आहे. हे करताना स्वतःला मी भाग्यवान समजतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा समादेशक होमगार्ड भवन व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी खासदार निलेश राणे, पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, उपअधिक्षक नितीन बगाटे, अॅड. अजित गोगटे आदी उपस्थित होते.