You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमारतीचे लोकार्पण..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमारतीचे लोकार्पण..

सिंधुदुर्गनगरी :

 

आपत्कालीन परिस्थिती, कोविडसारखी परिस्थिती व सण, उत्सव असो! पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक दल काम करत असते. देशाच्या हितासाठी योगदान देत असते. याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गौरवोद्गार काढले.

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले.आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते प्रथम गृहरक्षक दलाचे ध्वजारोहण करण्यात आले. वृक्षारोपणानंतर कोनशिला अनावरण करुन तिरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. फित कापून नव्या इमारतीचे लोकार्पण करुन पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कोविड काळात या नव्या इमारतीने देश सेवेबरोबर, देवसेवा केली आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर झालेल्या निधीतून निर्माण झालेली ही इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. तीचे लोकार्पण करताना स्वत:ला भाग्यवान समजतो. पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून गरजेच्यावेळी देशाच्या हितासाठी गृहरक्षक दल आपले योगदान देत असते. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता येत्या काळात गृहरक्षकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्हा समादेश तथा अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकेत जिल्ह्याच्या गृहरक्षक दलाबाबत आणि कामगिरीबाबत माहिती दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गृहरक्षकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा