लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेच्या दसरा मेळाव्यात निर्धार
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला.समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात किमान वेतन सुधारणा तात्काळ करावी ,यासह प्रमुख मागण्यांच्या न्याय हक्कासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.
यंञमाग उद्योगातील प्रमुख घटक असलेल्या सायझिंग उद्योगातील कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.यामध्ये कामगारांच्या किमान वेतनात सुधारणा नाही.मुळ वेतनात वाढ नाही आणि वाढलेल्या महागाईच्या मानाने बोनस मिळत नसल्याने या कामगारांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे.त्यामुळे या कामगारांमध्ये अस्वस्थता देखील निर्माण झाली आहे.या समस्यांवर विचार विनिमय करुन पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात
लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेने दसरा मेळावा आयोजित केला होता.यावेळी संघटनेचे अध्यक्ष व
जेष्ठ कामगार नेते प्राचार्य ए.बी.पाटील , मार्गदर्शक आनंदराव चव्हाण , सुभाष निकम , सेक्रेटरी सूर्यकांत हांडे ,
खजिनदार हणमंत मुत्तुर यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सायझिंग उद्योगातील कामगारांवर होत असलेल्या अन्याय विषद करत पुढील काळात न्याय हक्कासाठी संघटीतपणे लढा उभारल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.तसेच यासाठी सर्वांनी संघटीत होवून शासनाबरोबरच कामगारांवर अन्याय करणा-यांना आपली ताकद दाखवून द्यावी ,असे आवाहन केले.
यावेळी किमान वेतन सुधारणा तात्काळ झालीच पाहिजे , महापालिका झाल्याने कामगारांच्या मुळ वेतनात ६०० रुपयांची वाढ मिळावी ,वाढलेली महागाई लक्षात घेवून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी अधिक बोनस मिळावा ,अशी मागणी करण्यात आली.तसेच या
प्रमुख मागण्यांच्या न्याय हक्कासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी संघटनेचे
दशरथ जाधव , मारुती जाधव, शिवलाल कोलप , चंद्रकांत गागरे , रफिक कल्ले यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.