मुंबई
राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
कोविड – 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासत केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोविड -19 चे संकट मोठे असून या संकटकाळात सिेनमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते हे जरी खरे असले तरी महाराष्ट्राने पुनश्च हरिओम करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योग क्षेत्र सुरु केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे, रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील.आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही.
आपल्याला जगभरात काही देशांमध्ये कोविड -19 चा संसर्ग वाढल्याने युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला.हिवाळयात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा देण्यात आल्याने आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश आहे. सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरण प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करण्यात येणे,सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रेक्षक असणे या बाबी पाळल्या जाणे गरजेचे आहे. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.
बॉलीवूडची बदनामी दु:खदायक
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत.
आताचा काळ सिनेमागृहे सुरु करण्यासाठी महत्वाचा – अमित देशमुख
दसरा, दिवाळी, नाताळ असे लागोपाठ येणारे सण यामुळे या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. आता सिनेमागृहे सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी येतील, त्यामुळे आताचा काळ हा महत्वाचा आहे. परंतु सिनेमागृहे सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतरही सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी यालाच प्राधान्य असणार आहे. सिनेमागृहे सुरु झाल्यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे.
बैठकीस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह सिंगल स्क्रिन ओनर्स पैकी उदय टॉकीजचे नितीन दातार, पीव्हीआर सिनेमाचे संजीव, युएफओ मुव्हीजचे कपिल अग्रवाल, संजय गायकवाड, राजेश मिश्रा, पीव्हीआरचे अजय बिजली,आशीर्वाद थिएटर्सचे अक्षय राठी, आयनॉक्सचे आलोक टंडन,सिध्दार्थ जैन, सिनेपॉलीसचे देवांग संपत, पीव्हीआरचे कमल ग्वानचंदानी, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, राहूल हसकर, अटारिया मॉलचे कुणालवर्धन,झेविअर सोटोमेअर आदी उपस्थित होते.