You are currently viewing 49 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रशांत भालचंद्र चिपकर राज्यात प्रथम 

49 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रशांत भालचंद्र चिपकर राज्यात प्रथम 

वेंगुर्ले:

21 ते 25 सप्टेंबर 2022 यादरम्यान पार पडलेल्या 49 व्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्वरूपातील विज्ञान प्रदर्शनी चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून वेंगुर्ले तालुक्यातील जि.प. शाळा दाभोली नंबर 2 चे पदवीधर शिक्षक श्री. प्रशांत भालचंद्र चिपकर यांचा त्यांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्यासाठी राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा एक अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण म्हणजेच राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर यांनी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 49 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. हे विज्ञान प्रदर्शन तालुका जिल्हा व शेवटी राज्यस्तर याप्रमाणे आयोजित करण्यात आले. तालुकास्तरावरून विद्यार्थी, शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक/ परिचर या गटामधून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या प्रत्येक गटातून प्रत्येकी विजेत्या तीन स्पर्धकातून प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला जिल्हास्तरावर संधी देण्यात आली. जिल्हास्तरावरील सादरीकरण व परीक्षणानंतर प्रथम आलेल्या तीन विजेत्यांना राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये संधी देण्यात आली व त्यानंतर राज्यस्तरावर राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या तिन्ही विभागातील स्पर्धकांची अंतिम सादरीकरणाची फेरी ऑनलाइन स्वरूपामध्ये पार पडली व अंतिम सादरीकरणानंतर प्रत्येक विभागामध्ये विजेत्या तीन अंतिम स्पर्धक निवडण्यात आले .
उच्च प्राथमिक शिक्षक गट शैक्षणिक साहित्य निर्मिती या विभागामध्ये श्री प्रशांत भालचंद्र चिपकर या दाभोली नंबर 2, वेंगुर्ला येथील पदवीधर प्राथमिक शिक्षक यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने वेंगुर्ला तालुक्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर झळकले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी हा एक अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे .उच्च प्राथमिक शिक्षक निर्मिती शैक्षणिक साहित्य गटांमध्ये श्री. प्रशांत भालचंद्र चिपकर आणि मुंबई येथील पराग विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या श्रीमती मीनल चौधरी यांनी यांचा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळा मोगरा च्या शिक्षिका अलका पाटील यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर सांगली येथील जिल्हा परिषद शाळा मोराळे चे शिक्षक अमोल माने आणि रायगड मधील एस एस हायस्कूल आणि जुनियर कॉलेजच्या झीक्रिया काळसेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्रशांत चिपकर यांनी मिळवलेल्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर झळकत आहे.

प्रशांत चिपकर यांनी अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठीच्या स्वनिर्मित ‘शिक्षण मित्र’ या मोबाईल ॲप साठी प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला. सदर मोबाईल ॲप हे अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या सरावासाठी तसेच त्याच्या आत्मविश्वास वृद्धीसाठी आणि सामाजिक , भावनिक विकासासाठी उपयुक्त आहे. प्रशांत चिपकर हे दाभोली नं 2 शाळेचे उपक्रमशील पदवीधर शिक्षक असून कोरोना काळातही शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. सन 2021 – 22 या शैक्षणिक वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या SCERT विभागामार्फत राबविल्या गेलेल्या नवोपक्रम स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे.श्री चिपकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्राथमिक विभाग चे शिक्षणाधिकारी श्री. महेश धोत्रे, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी डॉ मुस्ताक शेख, उपशिक्षणाधिकारी श्री.आंगणे ,डाएट सिंधुदुर्ग च्या प्राचार्या श्रीम. तावशिकर , श्रीमती मांजरेकर , ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. एल. बी. आचरेकर व श्री. आर. पी. जाधव, वेंगुर्ला तालुका गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्री.संतोष गोसावी, विस्तार अधिकारी श्रीम. बाक्रे , केंद्रप्रमुख माननीय श्री प्रमोद गावडे ,वेंगुर्ले पंचायत समिती शिक्षण विभाग चे सर्व कर्मचारी, गट साधन वेंगुर्ले चे श्री सावंत , श्री टिळवे , श्री भोकरे , श्री सरवदे ,श्री कावले , श्रीम. आळवे,मुख्याध्यापक माननीय श्रीमती मराठे, दाभोली गावचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ श्री गुरुनाथ जोशी, शाळेतील व केंद्रातील सहकारी शिक्षक ,पालक ,विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा