You are currently viewing सर्व्हे प्रमाणपत्र न देणाऱ्या बंदर विभागाची मालवणात जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाई

सर्व्हे प्रमाणपत्र न देणाऱ्या बंदर विभागाची मालवणात जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाई

मालवण

मालवणातील जलक्रीडा व्यवसायात एकखिडकी योजनेसाठी बंदर विभागाने स्वतः पुढाकार घेऊन एकीकडे प्रयत्न सुरू केले असतानाच आज बंदर विभागाने अचानकपणे मालवण मधील जलक्रीडा व्यवसायावर आवश्यक कागदपत्रे पूर्ण नसल्याच्या कारणास्तव तीन व्यवसायिकांवर कारवाई करत मालवणातील सर्वच जलक्रीडा बंद पाडल्याने व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. बंदर विभागाच्या या दुटप्पी भूमिकेबाबत व्यवसायिकांनी बंदर अधिकाऱ्यांवर तीव्र असंतोष व्यक्त केला. तर पर्यटकांनीही व्यवसायिकांसमोर आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या कारवाई नंतर व्यावसायिकांनी बंदर विभागात भेय देत बंदर विभागाने सर्व्हे करून घेऊनही अद्याप सर्व्हे प्रमाणपत्रे दिली नसल्याबाबत विचारणा करीत बंदर विभागामुळेच कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असेल तर त्यात आमचा दोष काय असा सवाल केला मात्र बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर गप्प राहणे पसंद केल्याने बंदर विभागाच्या या दंडात्मक कारवाईबाबत शासनाची तिजोरी भरण्याचा तर हेतू नसावा ना अशी चर्चा किनारपट्टीवर सुरू आहे

मालवण मधील जलक्रीडा व्यवसायात अधिकृत- अनधिकृत यावरून यापूर्वीच वादंग सुरू असून दुसरीकडे बंदर विभागाच्या पुढाकारातून व्यवसायिकांची एक खिडकी करण्याचे प्रयत्नही सुरू आहे. तत्पूर्वी गेल्या महिन्यात पर्यटन हंगाम सुरू झाल्यावर बंदर विभागाने कागदपत्रे अपूर्ण असल्याच्या कारणास्तव काही व्यवसायिकांवर कारवाई केली होती. त्यानंतर व्यावसायिकांच्या नाराजीमुळे कागदपत्रे पूर्ण करण्यास एक महिन्याची मुदत देऊन व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी बंदर विभागाकडून देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने आज बंदर विभागाने प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली मालवण किनाऱ्यावर धडक मोहीम राबवित कागदपत्रे पूर्ण नसल्याबाबत तीन व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांची बोट इंजिन ताब्यात घेतले. या कारवाईत मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक उमेश महाडिक व बंदर विभाग कर्मचारी, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

सर्व्हे प्रमाणपत्र, पर्यटन संचलनालयाचे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र, आयव्ही नंबर प्रमाणपत्र, विमा आदी कागदपत्रे नसल्याबाबत ही कारवाई करण्यात आली. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर इंजिन व्यावसायिकांना परत देण्यात येतील, अशी माहिती मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली.

कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये असंतोष

मालवणात सध्या गोव्याहून येणाऱ्या पर्यटकांची रेलचेल वाढली असून हे पर्यटक जलक्रीडांचा आनंद घेतात आजही मालवण दांडी किनारी जलक्रीडा व्यवसाय सुरू असतानाच बंदर विभागाने धडक कारवाई करत जलक्रीडा व्यवसास बंद करण्याच्या सूचना दिल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. अचानक जलक्रीडा बंद केल्याने पर्यटकांचाही हिरमोड होऊन त्यांनी व्यवसायिकांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे संतप्त बनलेल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी बंदर विभाग कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांवर आपला असंतोष व्यक्त केला. यावेळी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, महिला आघाडीच्या सौ. अन्वेषा आचरेकर, रुपेश प्रभू, एजाज मुल्ला, दामू तोडणकर, अजित आचरेकर, हेमंत रामाडे आदी व इतर व्यावसायिक उपस्थित होते. कारवाई करताना एक दिवस आधी व्यावसायिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक होते. कागदपत्र अपूर्ण असल्याबाबत कारवाई होत असताना पूर्व कल्पना दिल्यास आम्ही स्वतःहून व्यवसाय बंद ठेवला असता. व्यावसायिकांनी सर्व्हे करून घेऊनही अद्याप बंदर विभागाच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सर्व्हे प्रमाणपत्रे रखडली आहेत. बंदर विभागामुळेच कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असेल तर त्यात आमचा दोष काय असा सवाल यावेळी व्यावसायिकांनी उपस्थित केला. अचानक जलक्रीडा बंद झाल्याने आलेल्या पर्यटकांना काय उत्तर देणार ? अपूर्ण सेवेबाबत पर्यटकही आम्हाला धमक्या देत आहेत, यावरून मालवणच्या जलक्रीडा बाबत चुकीचा संदेश पर्यटकांमार्फत पसरल्यास त्याचा विपरीत परिणाम येथील पर्यटनावर होण्याची शक्यता आहे, अशी भूमिका व्यावसायिकांनी मांडत आलेल्या पर्यटकांना सेवा देण्यासाठी आजच्या दिवसाची मुदत मिळावी अशी मागणी केली. यावर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन भुजबळ यांनी आजच्या दिवसापूरता काही तासांसाठी व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र उद्या दि. ५ ऑक्टोबर पासून सर्व जलक्रीडा बंद राहणार असून ज्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण असतील त्यांनाच व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यानुसार दुपार नंतर बंद झालेल्या जलक्रीडा पुन्हा सुरू करून सायंकाळी बंद करण्यात आल्या.

कारवाईमुळे व्यावसायिकांचे नुकसान

बंदर विभागाने अचानक कारवाई करत जलक्रीडा व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्याने जलक्रीडा व्यावसायिकांना नुकसानीस सामोरे जावे लागले. काही व्यवसायिकांकडे जलक्रीडेचे आगाऊ बुकिंग होते, तर काही व्यवसायिकांकडे आलेले पर्यटक ताटकळत राहिले होते. जलक्रीडा बंद ठेवण्याचा सुचनेमुळे काही व्यवसायिकांना बिल पेमेंटसह बुकिंग झालेल्या पर्यटकांची बुकिंग रद्द करावी लागली. यामुळे व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले.

प्रतिक्रिया व्यक्त करा