You are currently viewing महापुरुषांचे विचार मरत नसतात – प्रा.एस.एन.पाटील

महापुरुषांचे विचार मरत नसतात – प्रा.एस.एन.पाटील

वैभववाडी

भारताच्या इतिहासामध्ये अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जडणघडणीसाठी राष्ट्रपुरुषांनी दाखवलेला मार्ग त्या त्या काळाशी सुसंगत असाच होता. आज महात्मा गांधींसारख्या राष्ट्रपुरुषांचे विचार काहींना निरोपयोगी वाटतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रपुरुषांना मारता येते, परंतु त्यांचे विचार कधी मरत नसतात असे मत प्रा.एस.एन.पाटील यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर स्वातंत्र्यसेनानी व दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती व स्पंदन विभाग आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शन कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे, उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.एस.बेटकर, एनएसएस विभाग प्रमुख डॉ.एम.ए.चौगुले, इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील, डॉ.एन.व्ही गवळी, शिक्षकेतर कर्मचारी श्री.अरुण जैतापकर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींचे योगदान अव्दित्तीय असे आहे. त्यांनी जीवनात आचारलेली दशसूत्री हिच त्यांच्या यशस्वीतेचे गमक होते. तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जीवनकार्यही प्रेरणादायी आहे, असे प्रा.पाटील यांनी सांगितले. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा व सत्याग्रहाचा अवलंब करून असहकार, सविनय कायदेभंग व भारत छोडो सारख्या आंदोलनातून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधींचे विचार आजही दिशादर्शक असल्याचे डॉ.आर.एम.गुलदे यांनी सांगितले.


साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही महात्मा गांधींची सर्वमान्य ओळख होती.
सत्य अहिंसेच्या मार्गाने आंदोलन उभे करून शस्त्रविना स्वातंत्र्य मिळवता येते हा आदर्श महात्मा गांधींनी जगाला दाखवून दिला. म्हणूनच 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो, असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.राहुल भोसले यांनी केले तर आभार प्रा.डी. एस.बेटकर यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 6 =