You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या सिंधुदुर्गात

बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग राष्ट्रवादीला उभारी मिळण्यासाठी संघटनात्मक बदलाची शक्यता

महाराष्ट्राचे राजकारण जसजसे वळण घेते तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण बदलत जाते. महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना देखील राज्यात, अगदी जिल्ह्यात देखील शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी पक्षच उमेदीने वाढत होता. त्यावेळी राष्ट्रवादीला महाविकास आघाडीचा बुस्टर डोस मिळाला असल्याचे दिसत होते.
महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यावर मात्र चित्र पूर्णपणे पालटले आणि शिवसेना शिंदेगट चर्चेत आला. शिंदेगटाच्या नेत्यांनी मंत्रीपदाबरोबर जिल्ह्यात आपली पकड मजबूत केली, भाजप देखील मुसंडी मारत सत्तेवर स्वार झाला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अचानक मिळालेल्या धक्क्याने बॅकफूटवर गेली. अशावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील धुरंदर म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवार यांचा सिंधुदुर्ग दौरा म्हणजे राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी म्हणावा लागेल. शरद पवारांचे विचार आणि अनुभवाचे बोलच कार्यकर्त्यांच्या अंगात बळ निर्माण करतात याची प्रचिती अनेकदा आली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादी सत्तेत असताना देखील काही अपवाद वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख नेत्यांकडून पक्ष वाढीसाठी म्हणावा तसा प्रयत्न झालेला दिसून आला नाही. सावंतवाडी, दोडामार्ग तालुका वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी मागे पडल्याचेअसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला उभारी आणण्याच्या दृष्टीने संघटनात्मक बदल होण्याची देखील चिन्हे आहेत. पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, त्यामुळे पक्ष हिताच्या दृष्टीने कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आहे. शरद पवार यांचा दौरा हा येत्या विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याने जिल्हावासीयांच्या देखील त्याकडे लक्ष लागून आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =