You are currently viewing आंबा व काजू बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

आंबा व काजू बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

दोन लाखावरील कर्जदारांसह खावटी शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी…

ओरोस

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी २७ सप्टेम्बर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. तर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील सन २०१५ ते २०१९ मधील २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. तसेच २०१५ पासून खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. अल्पभूधारक व मध्यम मुदतीची कर्जे कोविड कालखंडात भरता आलेली नाहीत, यावर कर्जमाफी मिळावी. तोक्ते वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राहिलेली नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत. तसेच दरवर्षी खरीप व रब्बी पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी आज पासून लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. तसेच आपल्या मागण्यांबाबत शासनाने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
यावेळी महादेव परब, श्यामसुंदर राय, सुरेश गावकर, अर्जुन नाईक, प्रभाकर सावंत, सुभाष भगत, अशोक सावंत, नारायण गावडे, यशवंत तेली, प्रमोद सावंत, अजित माळकर आदि शेतकरी या उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =