You are currently viewing लवकरच ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबवण्यात येणार – मंत्री दीपक केसरकर

लवकरच ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबवण्यात येणार – मंत्री दीपक केसरकर

माझ्या मतदारसंघातून आमदारकीच लढवणार; खासदारकी नाही दीपक केसरकर यांचा दावा..

 

सावंतवाडी :

 

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागात आगामी काळात मोठ्या प्रमाणात विविध बदल करण्यात येणार आहेत. राज्यात ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणले. पूढील वर्षी नोव्हेंबर पर्यंत उर्वरीत उद्दीष्ट पूर्ण होईल. पुढच्या काळात विद्यार्थाना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. तर पोषण आहारामध्ये बदल करण्यात आला असून आहारामध्ये अंडी देण्यात येणार आहेत. मुलांना वाचन व स्वच्छतेबाबतही आवड व्हावी यासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहे शाळांमध्ये किचन गार्डन हा प्रयोगही अमलात आणण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आगामी काळात शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य एक नंबरवर असणार आहे, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात लाखापेक्षा जास्त शासकीय नोकर भरती करण्यात आली आहे. सर्व विभागांमध्ये पगारवाढही करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करण्यात आल्यामुळे स्वयंरोजगाराच्या बाबतीतही महाराष्ट्र आत्मनिर्भर होत आहे. महिला बचत गटांचा फिरता निधी वाढविण्यात आला असून या योजनांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे मानधनही वाढविण्यात आले आहे. आपला दवाखाना अभियाना सारख्या योजनांमुळे आरोग्य क्षेत्रातही सर्वसामान्यांना उपचाराची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी निश्चितच सुखाचे व समृद्धीचे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. कोकणातील मराठा समाजाने आम्हाला कोणीही नको स्वतंत्र आरक्षण द्या असे ठराव केले आहेत. मात्र जे आरक्षण मिळणार आहे ते टिकणार आरक्षण असायला हवं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज व सरकार मिळून एकत्रित ही लढाई लढाईची आहे. यासाठी मराठा बांधवांनी आंदोलनं करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये नुकत्याच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र, आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो. तर माझ्या मतदार संघातील खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे काहीही ग्रामपंचायती नाहीत असा प्रचार करणे चुकीचे आहे. तर दुसरीकडे मी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार असा प्रचारही काही जणांकडून करण्यात येत आहे. मात्र, मी माझ्याच मतदारसंघातून आमदारकीच लढवणार शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला ५० हजारचे मताधिक्य मिळून देणार, असा दावा त्यांनी केला.

बेळगाव वेंगुर्ला मार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आपण सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष वेधले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या असून मतदारसंघातील अन्य विकास कामाबाबतही आपण लक्ष ठेवून असल्याचे सांगत आगामी वर्षभरात उर्वरित विकास कामे निश्चितच पूर्ण होतील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा