You are currently viewing व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज- माधवराव भांडारी

व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज- माधवराव भांडारी

मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात व्यवस्था परिवर्तनाचे पर्व सुरू आहे.व्यवस्था परिवर्तन ही केवळ एका रात्रीत घडणारी गोष्ट नसून त्यासाठी मोठं नियोजन, मोठी तयारी आणि त्या परिवर्तनाच्या अंमलबजावणीसाठी मोठी हिम्मत लागते. सुदैवाने या सगळ्या बाबी मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या व्यक्तिमत्वात आणि कर्तृत्वात आहेत.
व्यवस्थेतील हे सकारात्मक बदल जाणीवपूर्वक जनतेपर्यंत जायला हवेत,त्याची चर्चा व्हायला हवी.अन्यथा त्याची किंमत रहात नाही असे प्रतिपादन ‘मोदी @ 20’ या पुस्तकाचे लेखक,प्रदेशाचे प्रवक्ते मा.माधवराव भांडारी यांनी यावेळी बोलताना केले.


भारतीय जनता पार्टीच्या ‘ ‘सेवा पंधरवडा’ या अभियानांतर्गत बुद्धिजीवी संमेलनात ‘व्यवस्था परिवर्तनाची 20 वर्षे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून डॉक्टर्स, वकील,इंजिनिअर,सी ए, प्राध्यापक,शिक्षक असा प्रज्ञावंत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या विषयाचे उदाहरण देताना ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी कागदपत्र ‘ट्रू कॉपी’ म्हणजे अटेस्टेड करण्याची ‘व्यवस्था’ होती.काही ठिकाणी यासाठी किंमतही मोजावी लागत होती,त्याचा त्रास सहन केलेली आपली पिढी आहे.आता ही व्यवस्था बदलून ‘सेल्फ अटेस्टशन’ पद्धत आली. हा खूप मोठा दिलासादायक बदल आहे. पण याची कधी चर्चा झाली नाही त्यामुळे या नवीन व्यवस्थेचे महत्व लोकांच्या लक्षात आले नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले की मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे नेतृत्व ही देशासाठी मोठी देणगी आहे.कोणतीही छोटी मोठी निवडणूक न लढवता पक्ष आदेशाने मोदीजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहीतच आहे.पुढे नाही ते स्वतः कधी एखादी निवडणूक हरले आणि ना कधी पक्षाला हरू दिलं.
मुख्यमंत्री पदाची 12 वर्षे आणि पंतप्रधान पदाची 8 वर्षे अश्या एकूण 20 वर्षाच्या वाटचालीचा आढावा ‘मोदी@20’ या पुस्तकात आहे.अनेक मान्यवरांनी त्यात मोदीजी आणि त्यांच्या कार्यशैलीवर लिहिलेलं आहे.
मोदींजीची धोरणे,त्यांचे व्हिजन आणि त्यांची कार्यशैली अनोखी आहे. खूप मोठ्या दुरदृष्टीची आहे.सामान्य राज्यकर्त्यांपेक्षा ते दहावीस वर्षे पुढचा विचार करतात.यावर्षी साजरा झालेला ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोहळा’ हा मा. पंतप्रधानांच्या संसदेतील पहिल्या भाषणातील एक विषय होता.त्यासाठीची योजना होती म्हणूनच तो संस्मरणीय झाला, लोकांना आपला वाटला, नाहीतर 1997 साल आपल्या सगळ्यांना आठवतं पण देशाचा ‘सुवर्णमहोत्सव’ आठवतो का?असा प्रश्न त्यांनी केला.
विकासाच्या,देशहिताच्या,संस्कृती रक्षणाच्या आणि राष्ट्राभिमान जागविणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं इतकं तपशीलवार नियोजन असल्याने आज देशात कालबाह्य व्यवस्थेत अनोखे परिवर्तन घडून आलेले आहे.
काही वर्षांपूर्वी इतर विकसित देशांकडून अवहेलना सहन करणारा आपला भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.विकासाच्या अनेक मापदंडात जगाच्या क्रमवारीत अव्वल ठरत आहे.हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत.यावेळी गमतीने बोलताना ते म्हणाले 2014 पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत एका बाबतीत मात्र मोदी सरकारची मोठी घसरण झालेली आहे,ती बाब म्हणजे ‘भ्रष्टाचार’..आज 8 वर्षे एकही छोटा मोठा घोटाळा नाही,एकाही केंद्रीय मंत्र्यांवर आरोप नाही.हे व्यवस्था परिवर्तन आहे.
सरकारी तिजोरीतून निघणारा प्रत्येक बंदा रुपया वाटेत सुट्टा न होता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होतोय. विरोधकांकडून तेव्हा चेष्टेचा विषय ठरलेली ‘जनधन’ योजना ही या ‘डीबीटी’ साठीची पूर्व योजना होती.बँकेच्या दारात कधी पाऊल न ठेवलेल्या जनतेची 47 कोटी खाती आणि त्यातली 78 हजार कोटींची ठेव हे आहे व्यवस्था परिवर्तन.
अश्याच प्रकारे आधार लिंकिंग, उज्वला सारख्या अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी केला.पुढे बोलताना ते म्हणाले की देशातल्या डिजिटल क्रांतीने तर अनेक देशांना मागे टाकलेलं आहे.
ओनम सारख्या सणाच्यावेळी घरोघरी जाणाऱ्या नंदी बैलांच्या कपाळावर जेव्हा QR कोडंच स्टिकर दिसतं तेव्हा या डिजिटल पेमेंट प्रकारच्या स्विकाहार्यतेची व्याप्ती लक्षात येते.
अमेरिकेसारख्या देशाच्या विमानतळावर अमेरिकेतला नागरिक आपलं लसीकरण प्रमाणपत्र खिशातून कागद काढून दाखवतो आणि भारतीय नागरिक तेच प्रमाणपत्र मोबाईल स्क्रीनवर दाखवतो तेव्हा ते चित्र देश किती वेगाने चाललाय हे स्पष्ट करतं.
म्हणूनच आठ वर्षांपूर्वी ज्या देशाचं मत कोणी विचारात घेत नव्हतं त्या देशाच्या ‘मतावर’ आज अनेकदा जागतिक पातळीवर ‘एकमत’ होतंय.अनेक उदाहरणांनी ते सिद्ध केलंय.
आपल्या देशवासियांना मातृभूमीत सुखरूप आणि सन्मानाने आणण्यासाठी दोन देशाच्या युद्धात ‘विराम’ घेतला जातो.हा परिणाम आहे गेल्या काही वर्षातल्या देशातील व्यवस्था परिवर्तनाचा आणि जगाने त्याची नोंद तसेच दखल घेतल्याचा. आपल्या बोलण्यात त्यांनी अश्या अनेक विषयांना स्पर्श केला.शेवटी बोलताना ते म्हणाले की कोरोना काळात या व्यवस्था परिवर्तनाचा अनुभव देशवासीयांनी घेतलेला आहे.लसनिर्मिती साठी देशात स्वतःच्या चार कंपन्या,विक्रमी वेळात देशवासीयांसाठी मोफत 200 कोटी डोस आणि जगातल्या 101 देशांना माफक दरात लस वितरित करणे ही मोठी कामगिरी आहे.प्रत्येक भारतीयाचा देशाभिमान वाढविणारी आहे.
समारोप करताना ते म्हणाले की आपण सर्व बुद्धिजीवी मंडळी आहात, ओपिनियन मेकर आहात. त्यामुळे हे बदल तुमच्यापर्यंत पोचविण्याचा हा प्रयास आहे.तुमच्या अभ्यासू वृत्तीने तुम्ही ते ताडून पाहावेत आणि तुमचा प्रभाव असलेल्या सामान्य जनतेपर्यंत न्यावेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही सेवा पंधरवडा या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलं,कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी तर सूत्र संचालन डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी केलं,आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.यावेळी व्यासपीठवर महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे,शरद चव्हाण, उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनीही यावेळी आपली मते मांडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =