You are currently viewing दोडामार्ग वनविभागाच्या हाती किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी अन्य एकजण ताब्यात

दोडामार्ग वनविभागाच्या हाती किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी अन्य एकजण ताब्यात

दोडामार्ग :-

 

अवैद्यरित्या किंगकोब्रा प्रजातीचा दुर्मिळ साप आपल्या ताब्यात ठेवल्याप्रकरणी दोडामार्ग येथे राहणाऱ्या राहुल निरलगी याचा जामीन फेटाळून लावल्यानंतर दोडामार्ग येथून फरार झालेला दुसरा आरोपी चित्रानंद पेडणेकर (वय 40 वर्षे) याला दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या टीमने काल मुंबई येथून ताब्यात घेतले. या आरोपीस चौकशी कामी उपस्थित राहणे विषयी वारंवार नोटीसद्वारे कल्पना देऊन देखील तो या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य न करता अनुपस्थित राहिला. तसेच आजवर केलेल्या तपासात त्याच्याविषयी काही महत्त्वाचे धागेदोरे वनविभागाच्या हाती लागल्यामुळे त्याला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी सर्प इंडिया या मुंबईस्थित एनजीओ  चा संस्थापक सदस्य असून ही संस्था सापांच्या रेस्क्यू विषयी काम करते. सदर कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी मा. दीपक खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दोडामार्ग मदन क्षीरसागर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, फिरते पथकचे पोलीस कॉन्स्टेबल गौरेश राणे व वाहनचालक रामदास जंगले यांनी यशस्वीपणे पार पाडली.

वनविभागाकडून दोडामार्ग तालुक्यातील तसेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सापांच्या रेस्क्यूसाठी काम करणाऱ्या तरूणांना आवाहन करण्यात येत आहे की वनविभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना कल्पना देऊन आपण सापांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे व रेस्क्यू केलेला साप वनविभागाचे कर्मचारी यांचे उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात मुक्त करावा. अवैधरित्या साप बाळगू नयेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना हाताशी धरून काही बाह्य संस्था वा व्यक्ती सापांच्या वा इतर कोणत्याही वन्यजीवांच्या तस्करी वा व्यापारात गुंतलेल्या असतील तर त्यांना बळी न पडता वनविभागाशी संपर्क साधावा व वनगुन्हे रोखण्यासाठी व तरुणाईला वाममार्गाला लागण्यापासून रोखण्यास मदत करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा