You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग आयोजित बॅ.नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभा कुडाळ येथे थाटात संपन्न

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग आयोजित बॅ.नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभा कुडाळ येथे थाटात संपन्न

राज्यसभा माजी सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर व राज्यसभा सदस्य ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांची खास उपस्थिती

कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग आयोजित बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. कोकणचे सुपुत्र, अलौकिक संसदपटू, युगनायक बॅ.नाथ पै यांच्या ऐतिहासिक महान कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी व त्यांच्या सर्वस्वी त्यागाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कोकण मराठी साहित्य परीक्षण व सहयोगी संस्थांच्या वतीने “बॅरिस्टर नाथ पै” अभिवादन सभेचे आयोजन कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख वक्ते माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी राज्यसभा सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर, कोमसाप केंद्रीय अध्यक्षा सौ.नमिता किर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, बॅरिस्टर नाथ पै यांची नात आदिती पै आदी उपस्थित होते. बॅ.नाथ पै अभिवादन सभेचे औचित्य साधून डॉ.भालचंद्र मुणगेकर यांची “असा मी घडलो” व “असा मी जगलो” या आत्मकथात्मक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.भालचंद्र मुणगेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कोमसाप केंद्रीय अध्यक्षा नमिता किर यांनी बॅ.नाथ पै यांच्याविषयी आदर व्यक्त करत आपल्या भाषणातून त्यांच्या कार्याचा गौरव केला. केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांनी देखील बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारखा संसदपटू होणे नाही असे सांगत कार्यक्रमासाठी उपस्थित डॉ.भालचंद्र मुणगेकर व कुमार केतकर यांचे उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले.
कुडाळ जिजामाता चौक येथून महालक्ष्मी हॉल कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढून मोठ्या उत्साहात कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी भाषणातून देशातील एकंदर परिस्थितीवर देखील मिश्किल भाष्य केलं. अजूनही देशात जातीय भेदभाव पाळले जातात याबद्दलही खंत व्यक्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला “बॅरिस्टर नाथ पै आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याची मागणी पंतप्रधान मोदी व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्राने करणार असल्याची माहिती दिली, त्याचप्रमाणे तसा ठराव उपस्थित नागरिकांच्या वतीने देण्याची घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार राज्यसभा सदस्य पद्मश्री कुमार केतकर यांनी भाषणाची सुरुवातच मिश्कीलपणे केली. कार्यक्रम स्थळी उशिरा आल्याने आपण उशिरा येण्याला केंद्राच्या रेल्वे खात्याची रेल्वे जबाबदार असल्याने त्यांच्या या आपल्या वतीने दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगत आपल्या मिश्किल भाषणातून उपस्थितींना खिळवून ठेवले. मराठी साहित्य परिषद असताना कोमसाप वेगळी काय गरजेची असा प्रश्न पडायचा, परंतु कोमसापने मराठी साहित्याला नवा आयाम दिला असे सांगत कोमसापची निर्मिती फलदायी असल्याचे सांगितले. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या आत्मचरित्राचे कौतुक करतानाच आजकाल लोक आत्मचरित्र लिहितात यावर मिश्कीलपणे बोलताना मोदींनी जर आत्मचरित्र लिहिलं तर रेल्वे स्टेशनवर चहा विक्री करत असलेल्या स्टॉल च्या उद्घाटन ला राणी एलिझाबेथ आली होती असेही लिहिले जाईल विनोद करत उपस्थितींमध्ये हास्य पिकविले. पं. नेहरू ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती होती, त्यांना बॅरिस्टर नाथ पै यांच्याबद्दल विशेष प्रेम होते, त्यामुळे बॅरिस्टर नाथ पै यांचा पराभव होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असायचे ही आठवण सांगितली. इंदिरा गांधींनी देखील नाथ पै यांना हरवायचे नाही अशा सूचना केल्या होत्या असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. प्रसार माध्यमांच्या आधारे लोकांना धार्मिक विषयात गुंतवून ठेवायचे असे आजचे राजकारण झाले असे सांगून व्यक्ती मोठी होते ती त्याच्या विचारातून, गांधीजींचे विचार तामिळनाडू पासून पेशावर पर्यंत पोचले होते याबाबत बोलताना 1 लाख अफगाणिस्थानींनी गांधीजींच्या पायावर शस्त्र ठेवत अहिंसा मार्ग स्वीकारला होता परंतु तेव्हा गांधींचे विचार मीडिया प्रभावी नसतानाही पोचत होते हे सांगताना कितीही मीडियाला हाताशी धरले तरी ज्वलंत विचार, सत्य लोकांपर्यंत पोहचते असे म्हणाले. पूर्वी नेहरू , इंदिरा गांधी, नाथ पै रोज सभागृहात यायचे परंतु आपल्या साडेचार वर्षाच्या काळात मोदी 5/6 वेळच सभागृहात आले हे देखील आवर्जून सांगितले. “नफरत छोडो भारत जोडो” यावरही प्रखर विचार मांडत आंबेडकर, नाथ पै, टिळक, सावरकर कोकणातून आलेत हे आमचं वैभव आहे. नाथ पै यांची प्रतिमा आपण टिकवली पाहिजे, त्यांचे विचार बाजूला न करता विचार जपुया अशी शपथ कुमार केतकर यांनी घेत चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यास समर्थन दिले. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी खास उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी व्यासपीठावर न जाता पाहुणे म्हणून कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. यात वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्रणिता कोटकर, सावंतवाडी, द्वितीय विराज आरावंदेकर, वेतोरे, तृतीय सुनिधी मराठे, रेडी, व उत्तेजनार्थ मनोहर सरमळकर ओरोस, मनाली कद्रेकर यांना मिळाला तर निबंध स्पर्धेत प्रथम प्रचिती सावंत, ओरोस, द्वितीय तनुजा तांबे कणकवली, तृतीय मनोहर सरमळकर ओरोस, तर उत्तेजनार्थ पांडुरंग दळवी आणि नीता सावंत यांनी क्रमांक पटकावले. या स्पर्धेत तब्बल 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता हे विशेष.
कार्यक्रमाचे आयोजन बॅरिस्टर नाथ पै अभिवादन सभा संयोजन समिती कोमसाप सिंधुदुर्ग प्रमुख मंगेश मसके आणि सदस्य, सहभागी संस्था अनुक्रमे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ, बॅरिस्टर नाथ पै, शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग, शिक्षक भारती सिंधुदुर्ग, कास्ट्राइब महासंघ सिंधुदुर्ग, बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ, बॅरिस्टर नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करूळ हायस्कूल, अंगणवाडी कर्मचारी सभा(महाराष्ट्र) सिंधुदुर्ग, राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्ग यांनी अतिशय चोख केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसाप जिल्हा सचिव विठ्ठल कदम व खजिनदार भरत गावडे यांनी केलं. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मंगेश मसके तर आभारप्रदर्शन दीपाली काजरेकर यांनी केलं. कार्यक्रमासाठी संजय वेतुरेकर, उमेश गाळवणकर, रुजारीओ पिंटो, आदिती पै, संदीप कदम, सुरेश ठाकूर, ऍड संतोष सावंत, आनंद वैद्य, वृंदा कांबळी, डॉ.जी ए बुवा, सुभाष गोवेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, कोमसाप सावंतवाडी, कुडाळ, मालवण, दोडामार्ग तालुका सदस्य तसेच सर्व सहयोगी संस्था सदस्य, आणि बॅरिस्टर नाथ पै प्रेमी आवर्जून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा