You are currently viewing तू …

तू …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तू …*

पैंजणाची खुळखुळ मंजुळ तू नाद
दंवभरल्या सकाळी तू दे ना मला साद
गुलाबाची पाकळी तू सकाळचे मऊ उनं
स्वप्न उषेला पडले तू सत्व माझे धनं ….

रथ आदित्याचा तुला पहाटे पाठवू
की चंद्र चांदण्याच तुझ्या साठी मी गोठवू
धुमकेतुचा तो हार शोभेल तुझ्या गळा
हिरवाईचं रान माझं शोभतेस मळा…

दिव्य गंगा आकाशीची आली माझ्यासाठी
पायघड्या निळाईच्या धुके ग ललाटी
गुलाल तू आभाळीचा केशर सुगंधी
फेसाळत्या उदधीची शोभतेस चांदी….

उतरले धुके अवतरे सोनपरी
रूप तुझे पाहताच धडधड होई उरी
निशिगंध माळून तू मोगरा तुडवी
बहाव्याचा डौल तुझा नाही तुझ्या गावी …

गुलमोहोरही फिका असे तुझे रूप
विधात्याने केली नाही कोणतीही चूक
पळस पांगारा फुले गाली तुझ्या लाली
सुगंधित सुमन तू डवरली डाली …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २१/०९/२०२२
वेळ : दुपारी १/४८

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + six =