You are currently viewing अपघातग्रस्त तेल वाहतूक जहाज  पार्थ च्या तेल गळती बाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतला आढावा

अपघातग्रस्त तेल वाहतूक जहाज  पार्थ च्या तेल गळती बाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी 

विजयदुर्ग ते देवगड दरम्यान 40 ते 45 वाव पाण्यात ‘पार्थ’ हे 101 मी. लांबीचे तेलवाहू जहाज दि.16 सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त झाले आहे.  कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सदर जहाजातून  दि.19 सप्टेंबर 2022 रोजी तेल गळती सुरु झाल्याची बाब कोस्ट गार्ड रत्नागिरी च्या निदर्शनास आलेली आहे. सदरची तेल गळती अपघातग्रस्त झालेल्या जहाजापासून 8 चौ. कि.मी. परिसरात झालेली आहे त्यापार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात अपघातग्रस्त  पार्थ तेलवाहू जहाजाच्या सद्यस्थिती बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भूजबळ, पोलीस निरीक्षक सागरी सुरक्षा बल अनिल जाधव, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतूल जाधव, वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे, देवगड तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजर्षी सामंत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था, गोवा यांचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर “पार्थ” जहाजातून होणारी तेल गळती ही घटना घडलेल्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला पसरणार आहे. त्यामुळे सदरची तेलगळती झाल्यास त्यामुळे देवगड, मालवण, वेंगुर्ला या किनाऱ्याबरोबरच गोवा राज्यातील किनारे देखील बाधित होणार आहेत. सदरची तेलगळती दि. 20 सप्टेंबर 2022 पासून जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर तेल गळती थांबविण्यासाठी कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्या यंत्रणेकडून या भागात 250 लिटर ऑईल स्पील डीस्परसंट (OSD) ची फवारणी हेलिकॉप्टर मधून करण्यात आलेली आहे. सदर तेल गळतीच्या ठिकाणी PANDI क्लब च्या स्वच्छता टीम कडून देखील आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. सदर तेल गळतीच्या अनुषंगाने कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्याकडून ऑईल स्पील डीस्परसंट (OSD) ची फवारणी कोस्ट गार्डच्या जहाजाकडून  सदर ठिकाणी 24 x 7 देखरेख अशा उपाययोजना सुरु आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा