You are currently viewing अपघातग्रस्त पार्थ जहाजातून तेल गळती नाही

अपघातग्रस्त पार्थ जहाजातून तेल गळती नाही

अपघातग्रस्त जहाजाविषयी कोणतीही माहिती कळल्यास संपर्क करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

अपघातग्रस्त पार्थ जहाजातून अद्याप कोणत्याही प्रकारची तेल गळती झालेली नाही. भविष्यात अशी घटना घडल्यास त्या अनुषंगाने कोस्ट गार्ड च्या मदतीने सदर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर बाबतीत कोणतीही भीती बाळगू नये. सदर जहाजाच्या अनुषंगाने कोणतीही माहिती कळल्यास त्या बाबतीत देवगड, वेंगुर्ला, मालवण या तालुक्याच्या मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभाग, पोलीस विभाग यांना याबाबत माहिती देण्यात यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

            विजयदुर्ग ते देवगड दरम्यान 40 ते 45 वाव पाण्यात पार्थ हे 101 मी. लांबीचे तेल वाहू जहाज 16 सप्टेंबर रोजी अपघातग्रत झाले असून सदर अपघातात जहाजावरील 19 खलाशी यांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेच्या अनुषंगाने कमाडंट कोस्ट गार्ड रत्नागिरी, प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ला, महसूल विभाग, उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण या यंत्रणांनी देवगड, मालवण, वेंगुर्ला या किनार पट्टीचे सर्वेक्षण करुन आपला अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना सादर केलेला आहे.

            कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्या अहवालानुसार अद्याप सदर जहाजातून कोणत्याही प्रकारे तेल गळती सुरु झालेली नाही. मात्र दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मत्स्य परवाना अधिकारी वेंगुर्ला यांनी सागरेश्वर किनारपट्टीची पाहणी केली असता, सदर किनारपट्टीवर तेल सदृश काळा द्रव पसरल्याचे स्थानिक मच्छिमार यांनी त्यांचे निदर्शनास आणून दिले. सदर किनारपट्टी भागाची छायाचित्रे कोस्ट गार्ड रत्नागिरी यांना पाठवून सदर भागाचा सर्व्हे करण्याची सूचना कोस्ट गार्ड रत्नागिरी यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आली. त्यानुसार आज दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्या टीमने येवून सागरेश्वर किनारपट्टी भागात पाहणी केली असता प्रथम दर्शनी तरी सदर पदार्थ हा मोठ्या शिपिंग बार्ज समुद्रातून जात असताना ते त्यांचे खराब तेल समुद्रात टाकतात ते तेल किनाऱ्यावर दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पार्थ नावाच्या जहाजाच्या दुर्घटनेचा सदर घटनेशी संबंध दिसून येत नाही. मात्र तरीही सदर ठिकाणचे तेलाचे नमुने कोस्ट गार्ड रत्नागिरीच्या टीमने तपासणीसाठी घेतलेले आहेत.

            समुद्रात पार्थ जहाजामुळे तेल गळतीची दुर्घटना घडल्यास त्याकरीता आवश्यक पूर्वतयारी कोस्ट गार्ड विभागाकडून करण्यात आलेली आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्यास सदर ठिकाणी डीस्परसंट चा वापर करण्याचे कोस्ट गार्ड चे नियोजन आहे, मात्र सदरचा पर्याय हा जास्त प्रमाणात तेल गळती झाल्यावरच वापरला जातो. कारण सदर डीस्परसंटमुळे सागरी जीव सुष्टीवर त्याचे साईड इफेक्टस देखील होवू शकतात. त्यामुळे परिस्थितीचे गांर्भीय बघूनच त्याचा वापर कोस्ट गार्ड कडून केला जाणार आहे. मात्र कोस्ट गार्ड ची समुद्रातील तेल गळती हा विषय हाताळणारी स्वतंत्र टीम या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. असे काही घडल्यास त्या बाबत आवश्यक त्या उपाययोजना कोस्ट गार्ड कडून त्वरीत घेतला जाणार असल्याची माहिती कोस्ट गार्ड कमांडट, रत्नागिरी यांचेकडून देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोस्ट गार्ड चे डॉर्निअर नावाचे जहाज २४X ७ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

            जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेकडून प्राप्‍त सूचनेनुसार तहसीलदार देवगड, पोलीस निरीक्षण देवगड आणि मत्‍स्‍य विभाग व बंदर विभाग देवगड यांनी दि. 18 सप्‍टेंबर 2022 रोजी मीठमुंबरी आणि कुणकेश्‍वर तालुका देवगड या समुद्र किनारी भागाची पाहणी केलेली आहे. सदर पाहणीबाबत तहसीलदार देवगड यांनी सादर केलेल्‍या अहवालानुसार सदर किनारी भागात ऑईल सदृश काळा पदार्थ निदर्शनास आलेला आहे. सदर ठिकाणी महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. लगटे यांनी सुध्‍दा भेट दिलेली आहे. सदरचा काळा पदार्थ हा डांबर नसून ऑईल सदृश असल्‍याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचे मत आहे. असा पदार्थ समुद्र किनारी अधूनमधून येत असतो असे तेथील घटनास्‍थळी उपस्थित असलेल्‍या स्‍थानिक मच्छिमार यांनी देखील सांगितले. सदर काळे पदार्थ हे पार्थ जहाज अपघातग्रस्‍त झाल्‍याने वाहून आलेले आहेत. असा निष्‍कर्ष आज रोजी काढता येणार नाही असे तहसीलदार देवगड यांनी आपल्‍या अहवालात नमूद केलेले आहे.

              प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांचे कार्यालयामार्फत बंदर निरीक्षक मालवण, देवगड आणि वेंगुर्ला परिस्थितीवर सातत्‍याने लक्ष ठेवून आहेत. जिल्हा आपत्‍ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेकडून उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी यांना देवगड, मालवण व वेंगुर्ला समुद्रातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 17 व 18 सप्टेंबर रोजी सदर तालुक्यातील समुद्राच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केलेले आहेत.

            कोस्ट गार्ड रत्नागिरी, प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ला, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण, तहसीलदार देवगड यांनी सदर घटनेबाबत वेळोवेळी सादर केलेल्या अहवालानुसार सदरचे अपघातग्रस्त पार्थ नावाचे जहाजात ‘बिटूमेन’ या डांबरजन्य तेल पदार्थाचा साठा होता जहाजातील बंकर्स मध्ये 140 मेट्रिक टन इंधन तेल आणि 30 मेट्रिक टन डीझेल इतका तेल साठा असल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =