वेंगुर्ला :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे जिल्हा चिटणीस निलेश सामंत यांनी मुंबई मध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी रस्ते, पूल बांधकाम बाबत अनेक समस्यांवर त्यांचे लक्ष वेधून निवेदन दिले.
यावेळी चिपी विमानतळाला आवश्यक असलेले रस्ते रुंद करताना लोकांना लवकरच जमीन मोबदला देऊ असे आश्वासन देऊन रस्ता रुंदीकरण करण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत मोबदला देण्यास सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. याकडे निलेश सामंत यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी मागणी केली.
तसेच विमानतळ गेट कडुन मालवणला जोडणारा जवळचा नवीन रस्ता तयार करण्यात यावा. शेळपी किल्लेनिवती हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा. मेढा निवती- श्रीरामवाडी ला जोडणाऱ्या नवीन पूलाच्या कामाला तात्काळ मंजुरी मिळावी अशा विविध मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या. याबाबत योग्य ती माहिती घेऊन सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले. यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते.