माणूसच माणसाच्या…
मदतीस धावला….!!
पावसाने कहर केला,
धरणीवर प्रहार झाला,
जिकडे पहावे तिकडे,
पाण्याने हाहाकार उडाला,
परमेश्वरही हतबल जाहला,
तिथे माणूसच माणसाच्या…
मदतीस धावला…!!
पुराने वेढा घातला,
मायबाप, गरीब, श्रीमंत,
आपुल्याच घरात जेव्हा,
पाण्यात बंदिवान जाहला,
मरणाच्या भीतीने तेव्हा,
देवाचा धावा करू लागला,
तिथे माणूसच माणसाच्या…
मदतीस धावला….!!
घरदार बुडाले,,,
पुराने वाहूनही गेले,
होत्याचं नव्हतं झालं,
संसार उध्वस्त झाले,
अन्नपाण्यासाठी जिथे,
मानव हतबल जाहला,
तिथे माणूसच माणसाच्या…
मदतीस धावला….!!
धर्माच्या नावावर कधी,
एकमेकांसमोर उभा ठाकला,
जातीपातीच्या भिंती कधी
कुंपणावर उभारल्या,
धर्म नी जातीसाठी कधी,
दोस्तची दुश्मन जाहला,
तिथे माणूसच माणसाच्या…
मदतीस धावला….!!
कुठला ना झेंडा दिसला,
ना पक्ष कुणास समजला,
हात हाताशी आला तो,
धरण्या पुढे सरसावला,
नियतीच्या या खेळापुढे,
देवही पाण्यात विसावला,
तिथे माणूसच माणसाच्या…
मदतीस धावला….!!
(दिपी)
दीपक पटेकर