*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*टपाल*
थकले होते डोळे
वाटेकडे नजरा खिळवून…
लेक नाही तर लेकाचं टपाल येईल..
एकच आशा होती माय मनी बाळगून…!
गळणाऱ्या डोळ्यातील आसवांनी…
फुटला होता उंबऱ्यालाही पाझर…
भिजलेला उंबरा सांगत होता…
“माते, दुःख तुझं आवर नि स्वतःला सावर…
पापण्या भिजल्या तरी कुठे भिजत असतो का वावर?”…
मातेचं हृदय पिळवळट होतं…
पोराच्या दोन शब्दांच्या खुशालीसाठी..
म्हणत होती मनामध्येच…
“पोर गेलंय कमाईवर वीतभर पोटासाठी…”
तेव्हा सुकत होती बुब्बुळं तिची…
सताड उघडी राहण्यासाठी…!
घंटा वाजता सायकलची…
माय डोळे वठारून पाही…
जाता जाता पोष्टमन माईला
मानेनेच खुणावत सांगे.. नाही…!
दिसावर दिस सरले, माय अंथरुणास खिळली…
समजलं नाही तिलाच तिची चिठ्ठी कोणी गिळली?
दारावरची कडी वाजली पण,
माय जागची नाय हालली…
पोराच्या चिंतेपोटी मातेने हाय खाल्ली…!
उघडताच दार दारातून उजेड आत आला…
दाराकडे डोळे लागल्या मातेच्या चेहऱ्यावर पडला…!
निपचित होता देह…
पोराने हंबरडाच फोडला…
ना टपाल ना खुशाली मिळता…
मातेने पोरासाठी होता प्राण सोडला…!
©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६