You are currently viewing अवैध दारु वाहतूकीत 7 लाख 34 हजाराची दारु जप्त

अवैध दारु वाहतूकीत 7 लाख 34 हजाराची दारु जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

-पोलीस निरीक्षक संदिप भोसले

सिंधुदुर्गनगरी

 जिल्ह्यात अवैध दारु वाहतूक व विक्री कारवाई अंतर्गत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबई – गोवा हायवेवर  गोवा बनावटी ची दारु भरुन जाणाऱ्या गाडीवर ओरोस येथील जिजामाता चौक येथे सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये सुमारे 7 लाख 34 हजाराची अवैध दारु जप्त करुन एका इसमावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात अवैध दारु वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई, करण्याबाबत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, अपर पोलीस अधीक्षक यांनी सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने अवैध  दारु  वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक, संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले होते. सदर पथकास दि.14 सप्टेंबर 2022 रोजी  महिंद्रा बोलेरो गाडी क्र. MH-02-CE-7222 यामध्ये गोवा बनावटीची दारु भरून सदरची गाडी गोवा – मुंबई हायवेने कणकवलीच्या दिशेने येत असलेबाबत माहीती मिळाली होती. त्यावरुन पथकाने सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. जीजामाता चौक, ओरोस येथे बोलेरो गाडी क्र. MH-02-CE-7222 ही येत असल्याचे दिसून आले. सदरची गाडी थांबवून खात्री केली असता सदर गाडीमध्ये 7,34,400/- रुपये (सात लाख चौतीस हजार चारशे) किंमतीची गोवा बनावटीची दारू मिळून आली.

याबाबत बिगर परवाना गोवा बनावटीची दारु वाहतूक करीत असताना मिळून आल्याने गाडीचा चालक याच्या विरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे गु.र.नं. 52/2022, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65(अ) (ई) अन्यये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात 5,50,000/- रुपये किमतीची बोलेरो गाडी क्र. MH-02-CB-7222 व 7,34,400/- रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू असा मिळून 12,84,400/- रुपये (बारा लाख चौन्याऐंशी हजार चारशे रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली संदिप भोसले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, अमित तेली, जयेश सरमळकर, चंद्रहास नार्वेकर यांनी केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा