You are currently viewing महिलांच्या समुपदेशन, कायदेशीर सल्ला केंद्राचे १६ रोजी उद्घाटन

महिलांच्या समुपदेशन, कायदेशीर सल्ला केंद्राचे १६ रोजी उद्घाटन

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा समन्वयक अर्चना घारे परब यांची माहिती

सावंतवाडी

महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचे सावंतवाडीत शुक्रवार १६ सप्टें. २०२२ ला उद्घाटन होणार आहे. विधी साक्षरता अभियानांतर्गत राज्यभर उपक्रम राबविला जात आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे महिलांसाठी कौटूंबिक समस्यांबाबत राज्यातील महिलांना सल्ला / मार्गदर्शन केंद्र सुरू केले जात आहे. तरी या उद्घाटन समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सौ. अर्चना घारे-परब यांनी केले आहे.

याबाबत घारे परब यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की सिंधुदुर्ग जिल्हा केंद्राचे उद्घाटन प्रथमेष कॉम्प्लेक्स, गाळा नं. 1, मिलाग्रीस शाळेजवळ, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. महिलांसाठी आर्थिक साक्षरता तसेच विधी साक्षरता असे उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून आता ‘कौटुंबिक समस्या : समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन’ हा आणखी एक उपक्रम सुरू करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यासाठी मार्गदर्शन केंद्रे असणार आहेत. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. विधी साक्षरता या अभियानाला राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत असून बऱ्याच महिलांना स्वतःशी संबंधित कायद्याच्या आणि अधिकाराच्या बऱ्याच गोष्टी माहीत नसल्याचे आपल्याला या कार्यक्रमांतून जाणवल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

राज्यातील बहुतांश महिलांना किंवा कुटुंबांना कौटुंबिक समस्या निवारणासाठी कायदेशीर प्रक्रिया असते याची खूपच कमी माहिती असते. परिणामी त्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते. त्यामुळेच ती कुटुंबे अथवा त्या महिला कायदेशीर प्रयक्रियेचा अवलंब करत नाहीत. अशा सर्व महिलांना आणि कुटुंबांना योग्य तो कायदेशीर सल्ला देत न्याय प्रक्रियेमध्ये आणणे किंवा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा, यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठीच यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे ‘कौटुंबिक समस्या : समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्रा’ची सुरवात करण्यात येत आहे.

पुणे आणि मुंबई सह, ठाणे, औरंगाबाद, बीड, सिंधुदुर्ग, परभणी, नाशिक, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही ही मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येत आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले. या केंद्रांमध्ये कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येईल. येत्या शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ पासून दर शुक्रवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राच्या ठिकाणी हे मार्गदर्शन केले जाईल असे सौ. सुळे म्हणाल्या अशी माहिती यशवंतराव चव्हाण सेंटर च्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सौ. अर्चना घारे-परब यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =