You are currently viewing अजय गोंदावळे यांच्या रूपाने उदयास आले भाजपाचे नवे नेतृत्व…

अजय गोंदावळे यांच्या रूपाने उदयास आले भाजपाचे नवे नेतृत्व…

संजू परब यांच्याहस्ते झाला शहराध्यक्ष गोंदावळे यांचा सत्कार..

सावंतवाडी शहराने राज्याला काही नावाजलेली राजकीय नेतृत्व दिली आहेत. शिवरामराजे भोसले, प्रविण भोसले, दीपक केसरकर यांच्यासारखी राजकीय नेतृत्व सावंतवाडीतील खाणीतूनच तयार झालेली आहेत. प्रविण भोसले यांनी राज्यमंत्री म्हणून राज्यातील मंत्रिमंडळात काम केले आहे, तसेच दीपक केसरकर यांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. सावंतवाडी नगरपलिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून आलेले दीपक केसरकर यांनी पुढे नगराध्यक्ष ते राज्यमंत्री असा यशस्वी प्रवास केला, सद्धस्थितीत सावंतवाडीचे आमदार म्हणून ते नेतृत्व करत आहेत. सावंतवाडी नगरपलिकेत केसरकर यांच्यानंतर बबन साळगावकर यांनी देखील आमदारकीसाठी प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सावंतवाडीत नवे नेतृत्व नगरपलिकेत आले ते म्हणजे संजू परब. संजू परब हे कट्टर राणे समर्थक. नितेश राणे यांनी अथक प्रयत्न करून त्यांना निवडून आणले. संजू परब यांना देखील आमदारकीचे वेध लागले असल्याने, सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून छाप पाडून येत्या विधानसभेला सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी भाजपा कडून पदरात पाडून घेण्याचे त्यांचे प्रयत्न असणार आहेत.
संजू परब यांच्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेत भाजपा कडून नव्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे संजू परब यांनी आपले समर्थक, मित्र अजय गोंदावळे यांना भाजपाच्या राजकीय प्रवाहात आणून सावंतवाडी शहराचे नेतृत्व त्यांच्या हाती सोपविले आहे. अजय गोंदावळे देखील राजकीय कसोटीवर खरे उतरत मंदिरे उघडण्यासाठी सावंतवाडीत घंटानाद आंदोलन करून जनतेच्या जवळ पोचण्याचे प्रयत्न करत आहेत. संजू परब विधानसभेसाठी इच्छुक असल्याने नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्याकडे परब यांचे शहरातील भावी वारसदार म्हणून पाहिले जात आहे.
सावंतवाडी भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष म्हणून अजय गोंदावळे यांची निवड झाल्याने संजू परब यांच्याहस्ते बॅरिस्टर नाथ पै व्यासपीठावर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अजय गोंदावळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अजय गोंदावळे यांनी देखील पक्षाने आपल्यावर दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास दिलीप भालेकर, केतन आजगावकर, दीपाली भालेकर, भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + ten =