You are currently viewing क्षमावली पर्व

क्षमावली पर्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन – रायबागकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*क्षमावली पर्व*

आले आले म्हणता म्हणता गौरी-गणपती आले आणि त्यांच्या आगमनामुळे उत्साहाने भारलेलं घर सुनं सुनं करून गेलेही. ते चैतन्यमयी दहा दिवस कसे चुटकीसरशी संपून गेले, कळलंही नाही.

या गौरी गणपतीच्या सणाला समांतर असा दिगंबर जैन धर्मीयांचा *पर्युषण पर्व* साजरा होत असतो. भाद्रपद शुद्ध पंचमी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवसांचा त्याचा काळ. पर्युषण पर्व हा त्यागाचा, संयमाचा, पूजा अर्चा, व्रत-उपवासांचा काळ मानल्या जातो. सर्व जैनधर्मीय यथाशक्ति हे पर्व साजरा करीत असतात.

या दहा दिवसातील प्रत्येक दिवसाला एक एक वेगळे नाव आहे. १) क्षमा २) मार्दव ३) आर्जव ४) शौच ५) सत्य ६) संयम ७) तप ८) त्याग ९) आकिंचन्य १०) ब्रह्मचर्य
तसेच या प्रत्येक शब्दामागे उत्तम हे विशेषण आणि शब्दापुढे धर्म हा शब्द जोडला जाते. उदा.- उत्तम क्षमा धर्म. कारण आपली उक्ती आणि कृती उत्तमच आणि मन:पूर्वक असावी असा त्याचा अर्थ. यातील प्रत्येक धर्माचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे.

इतरांप्रती क्षमा भाव ठेवणे, मृदू बोलणे, कपटरहित आचरण करणे,स्वच्छ, नितळ मन असणे, सत्याचीच कास धरणे, कुठल्याही बाबतीत संयम ठेवणे, तपाचरण करणे म्हणजे आजकालच्या भाषेत मेडिटेशन करणे, आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा, वस्तूंचा काही भाग दान करणे, प्रत्येक गोष्टीची, वस्तूंची मर्यादा ठरवून घेणे, आणि चारित्र्य सांभाळणे असा या दहा धर्मांचा साधारण अर्थ असतो. अर्थात याप्रमाणे आचरण हे फक्त या दहा दिवसांपूरतेच अभिप्रेत नसून ते आपल्या आयुष्यात व्यवहारातही नेहमीसाठी असावं हा त्यामागचा हेतू आहे.

अनंत चतुर्दशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी *क्षमावली* पर्व साजरे होते.
क्षमावली या शब्दाचा अर्थ क्षमा करणे आणि क्षमा मागणे. वर्षभरात आपल्याकडुन कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल दुसऱ्यांची क्षमा मागणे आणि आपल्या दृष्टीने दुसऱ्यांचे काही चुकले असेल तर त्यांनाही मोठ्या मनाने माफ करणे हा त्याचा अर्थ.

*क्षमितो सर्व प्राण्या, सर्व प्राणी क्षमोतही मजशी*
*सर्व प्राण्यांशी मम मैत्री राहो, न वैर कोणाशी*

इतकी पवित्र, उदात्त भावना या प्रथेमागे आहे. सोशल मिडियाचा प्रसार होण्याआधी प्रत्यक्ष बोलून, नमस्कार करून आणि पत्रांद्वारे लिहुनही क्षमा मागितली जायची.

जैन धर्मातील श्वेतांबर पंथीयांचा पर्युषण पर्व गणेश चतुर्थीला संपते. त्यामुळे ते ऋषीपंचमीच्या दिवशी *मिच्छामी दुक्कडम* म्हणून क्षमा मागतात. आणि दिगंबर पंथीय भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला किंवा भाद्रपद कृष्ण प्रतिपदेला *उत्तम क्षमा भाव* असे म्हणून क्षमावली पर्व साजरा करतात.

अर्थात इतर सर्व प्रथांप्रमाणे क्षमावली पुरती क्षमा मागुन पुन्हा वर्षभर मनांत अढी ठेवून रहाणे हेही व्यवहारात चालतच असते. परंतु एका दिवसापुरती का होईना क्षमा मागतो हे ही नसे थोडके.

पाश्चात्यांच्या प्रमाणे प्रत्येक वाक्यात *सॉरी* किंवा *थँक्यू* म्हणणे ही चांगली प्रथा आपण नक्कीच उचलली आहे. परंतु वाणीपेक्षा आचरणात जेव्हा ती येईल तेव्हाच तिचं महत्त्व.

माझ्याकडुन सर्वांसाठी उत्तम क्षमाभाव आणि क्षमायाचना.

सौ. भारती महाजन रायबागकर
चेन्नई
9763204334
१०-९-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 3 =