*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मास्तरचा कोट*
वर्गात आधी छडी शिरायची
मागून मास्तर यायचा
कुणाला धपाटा बसल्यावरच
वर्ग सुरू व्हायचा
मास्तरच्या त्या कोटात
भोकांची बनियन!चुरगळलेला
पांढरा शर्ट झाकून जायचा
पण त्या कोटाला बघताच
पोरांना घाम फुटायचा
मास्तर शिकवत राहिला की
पोरं मान डोलवायची
एखादी मान स्थिर झाली की
पाठीत बुक्की बसायची
मास्तर आईची कविता शिकवायचा
पोरं शेंबूड पुसत रडायची
मास्तर पोरांच्या मागे जावून
सोग्यात डोकं लपवून !रडून घ्यायचा
कोटातला मास्तर शिकवत मारत
पोरांना एकएक वर्ग पुढे न्यायचा
त्या कोटाला पडलेली ठिगळं
एकएक करून रफ्फू करायचा ञा
कोटातला मास्तर तिथचं राहिला
पोरं शाळा शिकून निघून गेली
पुढं ती शिकली! नाही शिकली
पण मास्तर वाचायला शिकली
रफ्फू असलेला कोट दिसताच
ती पाया पडायला शिकली …!!
बाबा ठाकूर