You are currently viewing दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात देवबागमध्ये एसटी बसचा अपघात

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात देवबागमध्ये एसटी बसचा अपघात

मालवण

मालवणहून देवबागला जाणारी एसटी बस ही वळणदार उताराच्या रस्त्यावर आली असताना समोरून अचानक आलेल्या महिला दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात ही बस घसरून रस्त्यालगतच्या दगडी कुंपणाला आदळून अपघात घडला. आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेनाही मात्र एस टी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

मालवण एसटी आगारातून आज दुपारी सुटलेली मालवण देवबाग एसटी बस देवबागच्या दिशेने जात असताना इसदा स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या पुढील उतार असलेल्या वळणदार आणि धोकादायक अशा रस्त्यावर आली असता याच वेळी दोन महिला दुचाकीने मालवणच्या दिशेने जात होत्या. या अरुंद रस्त्यावर अचानक समोर दुचाकी आल्याने धडक बसण्याच्या शक्यतेने बस चालकाने दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला घेतली असता बस उतारावर घसरून रस्त्यालगत असलेल्या पेडणेकर यांच्या दगडी कुंपणाला धडकली. यात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तसेच कंपाउंडचे दगडही कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ज्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला त्या डबलसीट दुचाकीस्वार महिलांनी पळ काढल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना इतर वाहनांमधून त्यांच्या इच्छितस्थळी सोडण्यात आले. या अपघातात बस चे नुकसान झाले असून दगडी कंपाउंड कोसळलेल्या पेडणेकर यांनी आपल्या नुकसानी बाबत कोणतीही तक्रार दिलेली नाही अशी माहिती एसटी मालवण आगाराचे व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =