You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील श्री प्रफुल्ल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

वैभववाडी तालुक्यातील श्री प्रफुल्ल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

वैभववाडी :

 

वैभववाडी तालुक्यातील महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक श्री प्रफुल्ल जाधव यांना यावर्षी सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, सचिव शुभांगी पवार यांनी ही माहिती दिली.

गतवर्षीपासून सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या शिक्षकांना सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक सदाशिव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तसेच सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. कणकवली येथे लवकरच पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

प्रफुल्ल तुकाराम जाधव हे वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी गावचे सुपुत्र आहेत. ते गेली १७ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी एम. ए. (इंग्रजी), डी. एड., बी. एड. पदवी प्राप्त केली आहे. वैभववाडी तालुक्यातील जि. प. विद्यामंदिर नावळे धनगरवाडा या प्रशाळेतून आपल्या शिक्षण सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर विद्या मंदिर करूळ भट्टीवाडी येथे शिक्षणसेवा केली आणि ०७ मे, २०१९ पासून आजअखेर ते श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यामंदिर नावळे धनगरवाडा प्रशालेत हजर होत लोकसहभागातून सुमारे ५० हजार रक्कम व विविध साहित्य त्यांनी शाळेसाठी जमा केले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित ‘शालेय क्रीडा, कला व ज्ञानी मी होणार महोत्सव’, ‘समूहगान’ स्पर्धेत जिल्हास्तरावर त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ‘विद्यार्थी बचत बँक’ हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना त्यांनी बचतीची सवय लावली. विद्यार्थांना शिष्यवृत्ती परीक्षेस, स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ करून ते त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करतात. शिवाय आर्थिक-सामाजिक दृष्ट्या मागे असलेल्या मुलांना, दिव्यांग विद्यार्थांना सोयीसवलती मिळवून देण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते सतत कार्यशील असतात. विविध कार्यानुभव, कला, आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांच्या आयोजनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. इंग्रजी संभाषणासाठी शाळा स्तरावर सुरू असलेल्या तेजस उपक्रमांतर्गत खांबाळे (ता. वैभववाडी) केंद्राचा Tag co-ordinator म्हणून ते कार्यरत आहेत.

शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कार्यातही त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या माध्यमातून वैभववाडी येथील ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन’ उभारणीत त्यांनी योगदान दिले आहे. तसेच तालुका बौद्ध सेवा संघाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार विषयक उपक्रमांत ते सक्रिय सहभागी असतात. तालुका संघाच्या माध्यमातून युवा वर्गाचे संघटन करून त्यांना शैक्षणिक सहाय्य मिळवून देण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार याबाबत जाणीव, जागृती करण्यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न राहिला आहे. युवा वर्गाला सामाजिक भान यावे यासाठी ‘वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघा’च्या माध्यमातून युवा शिबीरांच्या आयोजनात त्यांचा कृतीशील सहभाग राहिला आहे.

सांगुळवाडी गावातील सर्व जाती धर्माच्या युवकांना एकत्र करून त्यांनी ‘शिवमहोत्सवा’ची संकल्पना मांडली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दुर्लक्षित व्यक्तींना ‘शिवसन्मान’ पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येतो. शिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही या महोत्सवा अंतर्गत केला जातो. तसेच विज्ञान प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, प्रबोधनपर जलसा, बचत गटांचे प्रबोधन व वस्तू प्रदर्शन विक्री अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमातून शिवविचारांची पिढी घडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. प्रफुल्ल जाधव यांचे साहित्य क्षेत्रातही योगदान असून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ पुरस्कृत ‘त्रैमासिक वैभवपर्व’ (डिजिटल) वैभववाडीतील आंबेडकरी चळवळीचा दस्तावेज’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक दैनिकांच्या विविध पुरवण्यांत त्यांच्या काही कथा, कविता व लेख प्रसिद्ध झाले आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री जाधव यांचे तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + fifteen =