You are currently viewing माझी गौराई

माझी गौराई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*🙏 माझी गौराई 🙏*

आल्या ‘गौराई’ घरात
विराजिल्या मखरात
त्यांच्या प्रसन्न कृपेची
करिताती बरसात ||

दारा तोरण बांधिले
रांगोळीचे रेखाटन
त्यांच्यासाठी दारापुढे
सजविले वृंदावन ||

ज्येष्ठा कनिष्ठा बहिणी
गोड माहेरवाशिणी
त्यांच्या माहेरी येण्याने
डोळा आनंदाचे पाणी ||

त्यांचे रूप हे देखणे
झाली गं नजरबंदी
घर उभे दिमतीला
होती सगळे आनंदी ||

कौतुकाच्या ग पाहुण्या
किती करू त्यांचे लाड
त्यांच्यासाठी रांधियले
नाना पदार्थ हे गोड ||

किती गाऊ त्यांचे गुण
त्यांच्या गुणा नाही पार
दोन दिस आल्या तरी
त्यांचा वास सालभर ||

आई तुझी कृपादृष्टी
घालो मायेची पाखर
नांदो आरोग्य समृद्धी
सर्वांठायी घरोघर ||

माझी माऊली दयाळू
सर्वांवरी कृपा करी
तुझ्या समृद्धीच्या खूणा
ठेव आई घरी दारी ||

तुझ्या समृद्धीच्या खूणा
ठेव आई घरी दारी ||

ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − fifteen =