You are currently viewing मराठा सेवा संघाची दमदार वाटचाल..

मराठा सेवा संघाची दमदार वाटचाल..

१ सप्टेंबर मराठा सेवा संघाचा वर्धापन दिवस. आज मराठा सेवा संघाच्या कामाचा विस्तार संपूर्ण जगात झालेला आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाने नुसतं मराठा या शब्दाभोवती सिमीत न राहता सर्व बहुजन समाजाला सामावून घेण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला फार मोठा कालावधी गेलेला नाही. पण या 32 ते 33 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा सेवा संघाने महाराष्ट्रामध्ये जनजागृतीचे काम केलेले आहे ते अनन्यसाधारण आहे. अर्थातच याचे सर्व श्रेय युगपुरुष श्री पुरुषोत्तम खेडेकर यांना द्यावे लागेल. अतिशय परखड विचारसरणी स्पष्ट वक्तेपणा व धाडसी निर्णय यामुळे या महामानवाने मराठा सेवा संघाला एका उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. काल परवा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची झालेली युती म्हणजे मराठा सेवा संघाचे एक पुढचे पाऊल म्हणावे लागेल. राजकीय पक्ष कोणताही असो त्याला सर्वसमावेशक पुरोगामी दृष्टिकोन असला पाहिजे. आम्ही आता मराठा सेवा संघाची धुरा तरुण लोकांकडे दिलेली आहे. मी तरुण असताना मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी झोकून दिले होते. गेल्या अनेक वर्षाचा चळवळीचा अनुभव असल्यामुळे मला कार्यक्रम नियोजनाचे बाळकडू माझ्या महाविद्यालयीन जीवनातच मिळाले होते. त्यानंतर साहित्य संगम, शहीद मदनलाल धिग्रा युवक संघ, बहुजन साहित्य परिषद, विदर्भ सत्यशोधक मंडळ या सर्वांमुळे माझी पाळेमुळे पक्की झाली होती. अशातच मराठा सेवा संघाची स्थापना झाली. माझा मराठा सेवा संघामध्ये शिरकाव श्री दामोदरपंत टेकाडे गुरुजी यांच्यामुळे झाला. तेव्हाचे अध्यक्ष श्री डहाणे हे शिवकृपा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहायचे. श्री टेकाडे हे त्यांचे मित्र आणि श्री टेकाडे हे माझे मार्गदर्शक, तो मराठा सेवा संघाचा सुरुवातीचा काळ होता. तोपर्यंत चळवळीमध्ये मी जवळपास पंधरा वर्ष ज्येष्ठ होतो. मराठा सेवा संघाची सूत्रे हातात आल्यानंतर मी सर्वप्रथम बोलाविले ते सत्यपाल महाराजांना. मराठा सेवा संघाच्या विचारपीठावर हा सत्यपाल महाराजांचा पहिलाच कार्यक्रम होता. या कार्यक्रमाने अमरावतीचा इर्विन चौक गजबजून गेला आणि सत्यपाल महाराज आणि मराठा सेवा संघ हे समीकरण कायमचे जोडले गेले. पुढे अमरावतीला आम्ही श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये मराठा सेवा संघाचे तीन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन घेतले. राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे इंद्रधनुष्य पेलण्यासारखे होते. मी त्यावेळेस मराठा सेवा संघाचा सरचिटणीस होतो. मी जबाबदारीने काम स्वीकारले. सहा महिने सुटी टाकली. सकाळी १० ते रात्री १० किंवा मध्यरात्र असा एक सूत्री कार्यक्रम सुरू केला. बोलणारे खूप असतात. करणारे खूपच कमी. पण मी कार्यकर्ता संघटक लेखक पत्रकार असल्यामुळे बऱ्याचशा बाजू मी समर्थपणे सांभाळल्या. प्रसंगी आर्थिक झळही सोसली. श्री.पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाज खळबळून जागा केला. एक क्रांतीच म्हणावी लागेल. श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांनी सर्वप्रथम मराठा समाजातील नोकरी करणारा वर्ग आपलासा केला आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात व नंतर भारतात व नंतर जगात मराठा सेवा संघाच्या ठिकठिकाणी शाखा काढल्या. या अनेक शाखांना खेडेकर साहेबांबरोबर जाण्याचा मला योग आला. खेडेकर साहेब जरी मराठा सेवा संघामध्ये असले तरी सर्व समाजातील लोकांबरोबर त्यांचे ऋणानुबंध मधुर होते, आहेत व राहतील. मला आठवते. अमरावतीचे तेव्हाचे विभागीय आयुक्त श्री. ह रा कुलकर्णी हे अमरावतीला रुजू होण्यासाठी आले तर ते विश्रामभवनावर जाण्याचे आधी पुरुषोत्तम खेडेकरांच्या दयासागर जवळील कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थानी आले. योगायोगाने त्यावेळेस मी खेडेकरसाहेबांकडेच होतो. एक ब्राह्मण वरिष्ठ अधिकारी रुजू होण्यापूर्वी खेडेकरसाहेबांकडे येतो यामध्ये सर्व काही आले. कारण की पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठा सेवा संघाच्या ज्या कक्षा आहेत आणि त्याचे जे विस्तारीकरण केले. त्यामुळे केवळ मराठा समाजाच नव्हे तर पुरोगामी विचाराचा प्रत्येक जण मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, श्री संत तुकोबाराय साहित्य परिषद अशा विविध कक्षांशी जोडल्या गेले आहेत. आज मराठा सेवा संघ अत्र तत्र सर्वत्र दिसत आहे. आज अनेक लेखक मराठा सेवा संघाने जन्माला घातलेले आहेत आणि वक्त्याची तर फौजच निर्माण केलेली आहे व त्यांना चांगले मानधन द्या. कारण की त्या मानधनावरच त्याचा उदरनिर्वाह आहे असा सल्ला खेडेकर साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना दिला आहे. आजच्या काळात आपण अमरावतीचाच विचार केला तर एड. गणेश हलकारे, प्रेमकुमार बोके प्रा. क्षिप्रा मानकर, मयुराताई देशमुख, मनाली तायडे, तुषार देशमुख त्यांच्यासारखे कार्यकर्ते व वक्ते मराठा सेवा संघाने समाजाला दिले आहेत. आज मराठा सेवा संघाचा वर्धापन दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे. अमरावती येथे देखील मराठा सेवा संघ अमरावती शाखेने रहाटगाव रोडवरील समाजातील जिजाऊ लाँनमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या कार्यामुळे स्वतःचा आगळावेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा नागरिक सत्कार आयोजित केलेला आहे. सत्कारामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते तर ज्येष्ठांना त्यांच्या कार्याची पावती मिळते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेची शिदोरी देणाऱ्या मराठा सेवा संघाचे हे कार्य असे सुरू राहो. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ या. आणि मराठी पाऊल पडते पुढे असे म्हणू या. आजच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूरला मराठी विद्यापीठ स्थापन होण्यास पुढाकार घेतलेला आहे. खरं म्हणजे हे विद्यापीठ अगोदरच व्हायला पाहिजे होते. पण त्याला विलंब लागला. पण उशिरा का होईना. आपल्या विदर्भातील रिद्धपूर जी महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखण्यात येते त्या ठिकाणी मराठी विद्यापीठ होत आहे ही खूप जमेची बाजू आहे. मराठा सेवा संघ व मराठी विद्यापीठ अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत राहो व सर्वांना सोबत घेऊन चालणारा मराठा सेवा संघ सातत्याने मार्गक्रमण करीत राहो ही मनोमन शुभेच्छा.

आज गुरुवार दि १ सप्टेंबर २०२२रोजी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन अमरावतीच्या जिजाऊ लॉन मध्ये संपन्न होत आहे.

– *प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे माजी सरचिटणीस. मराठा सेवा संघ. अमरावती.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 5 =