You are currently viewing प्रेम संबंध नाकारल्याच्या रागातून खून???

प्रेम संबंध नाकारल्याच्या रागातून खून???

विकसित समाजात असे अविचारी गुन्हे का घडतात???

संपादकीय..

वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावात कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे (वय २०) ही २७ ऑगस्टला बेपत्ता झाली. वेंगुर्ले पोलीस स्थानकात २८ ऑगस्टला सायली बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली. मठ येथून बेपत्ता झालेली सायली हिचा मृतदेह आडेली येथील एका आंब्याच्या बागेत डोक्याच्या पाठीमागे व नाकावर जखमा आणि गळा आवळल्याने गळ्या भोवती कला व्रण अशा अवस्थेत आढळला.
सायलीचा खून तिच्याच ओढणीच्या साह्याने गळा आवळून करण्यात आला. डोक्याच्या पाठीमागे व चेहऱ्यावर जखमा होत्या. संशयित म्हणून सायली हिच्याच मैत्रिणीचा नवरा गोविंद उर्फ वैभव दाजी माधव (वय ३०) राहणार परुळे याच्यावर भादंवि कलम ३०२ चा गुन्हा दाखल झाला.
गेल्या काही वर्षांतील ही नवी पिढी डिजिटल युगातील सोशल मीडिया सारख्या च्या माध्यमातून एकमेकांकडे आकर्षिली जात आहे. जोपर्यंत सोशल मीडिया नव्हतं तोपर्यंत अशा प्रकारचे गुन्हे क्वचितच घडताना दिसत होते. परंतु व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदींच्या माध्यमातून संवादाची देवाण-घेवाण होते, हळूहळू फोटो व्हिडिओ अशी देवाण-घेवाण सुरू होते, त्यातूनच एकमेकांबद्दल आकर्षण वाढते आणि या आकर्षणालाच प्रेम समजून एखादी व्यक्ती आपल्याशी बोलणाऱ्या, आपल्या स्वभावामुळे आपल्या जवळ आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या एकतर्फी प्रेमात पडते आणि हा प्रेमाचा प्रवास अखेर त्यांच्या प्रेमाचा किंवा प्रियकर / प्रेयसीचा तरी जीव घेतो आणि संपतो. अलीकडे सर्रास वाचनात आलेल्या “प्रेम प्रकरणातून खून” अशा घटना या शक्यतो विवाहित पुरुष किंवा स्त्रियांच्या बाबतीत घडताना दिसत आहेत. स्वतःचे लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला प्रेम देऊन आपला संसार सुखाचा करण्यापेक्षा काही विक्षिप्त स्वभावाच्या व्यक्तींमध्ये एकापेक्षा अनेक स्त्रियांच्या सौंदर्यावर भाळून स्त्रीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून एक तर तिच्या मजबुरीचा फायदा घ्यायचा किंवा तिला बदनाम करायचे, आपल्या सोबत तिचे फोटो व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करणे, वेळप्रसंगी आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण न झाल्यास तिचा गळा घोटणे आणि आपलं तिच्यावर असलेले प्रेम हे प्रेम नसून राक्षसी वृत्तीच्या माणसाचे आकर्षण होतं हे सिद्ध करण्यासारखेच आहे. आपल्या बागेतील गुलाबाच्या फुलांवर प्रेम करणारा माळी सुद्धा गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्याही कधी तोडत नाही, परंतु जिवंत माणूस मात्र आपण प्रेम करत असलेल्या जिवंत व्यक्तीचा जीव घेऊन काय मिळवतो? हा मात्र फार मोठा न सुटणारा प्रश्न आहे. खरं प्रेम म्हणजे काय हे न समजलेली व्यक्ती आकर्षणाला प्रेम समजून दुसऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा गैरफायदा घेत नजरेने तिच्या शरीराचा, सुडौल बांध्याचा आस्वाद घेणे, तिच्यावर मानसिक, शारीरिक बलात्कार करणे, तिचा शारीरिक, मानसिक छळ करणे, अत्याचार करणे असे अमानुष कृत्य करतो आणि ज्यावेळी समोरची व्यक्ती त्याच्या प्रेमाला अस्विकार करते तेव्हा मात्र तिच्या गळ्याचा घोट घेतला जातो.
आज सोशल मीडिया मधून अगदी तारुण्यातच कित्येकांना प्रेम प्रकरणात होणारे त्रास आणि प्रेम प्रकरणातून कशाप्रकारे जाळ्यात ओढले जाते, याबद्दल बऱ्याच प्रमाणात माहिती प्राप्त झालेली असते. तरीदेखील एखाद्याच्या प्रेमाच्या जाळ्यात आजच्या युगातील मुली कशा काय फसतात? आणि एखाद्या परक्या व्यक्तीबरोबर तासनतास मोबाईल वर गप्पा मारणे, फिरायला जाणे, चॅटिंग करणे अशा प्रकारची कृत्ये कशी काय करतात? तरुण वयात मुला मुलींकडून चुका या होतच असतात परंतु त्या चुकांमधून बोध घेऊन आपल्या आयुष्याची नौका पार निर्णय नेणे अत्यंत आवश्यक असते. बऱ्याच वेळा आकर्षण किंवा एखादी मुलगी आपल्याशी बोलते म्हणजे आपल्यावर ती प्रेम करते हा गैरसमज किंवा राक्षसी महत्त्वाकांक्षा माणसाला गैरकृत्य करण्यास भाग पाडते आणि त्यातून सायली सारख्या प्रेमप्रकरणातून खून अशी प्रकरणे घडतात.
बदलत्या युगात मुले मुली नवनवीन येणारी फॅशन अंगीकारत असतात, नवनवे मोबाईल घेतात आणि नव्या पद्धतीने आपले जीवन जगत असतात परंतु प्रेम प्रकरणासारखे जुने खेळ मात्र सोडून देण्याच्या विचारात नसतात. ज्याप्रमाणे नव्या युगातील बदलांना मुला मुलींनी अंगीकारले त्याचप्रमाणे भविष्याकडे लक्ष केंद्रित करून प्रेमप्रकरणासारखे जुनी जाळी कुरतडून फेकली पाहिजेत तरच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत त्यांना नक्कीच आळा बसेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 1 =