You are currently viewing सुकुमारा

सुकुमारा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी चि.उत्कर्षच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

सुकुमारा

तुझ्या मुळे मी आई झाले गुणवैभव सुकुमारा
मम बाळाला आशिष द्यावे हृदयातुन ओंकारा ||धृ||

तुझ्याकडे मी बघते तेव्हा नवसंजीवन मिळते
सुहास्य मुद्रे मुळे मनीचे क्लेश दुःखही हरते
कर्तृत्वाच्या अभिमानाने सौख्यच येई दारा||१||

विश्वच माझे तुझ्यात नांदत असते रे विनयाने
स्वप्नांचे ते पंख पखेरू उडती कौशल्याने
नयनांच्या मी ज्योती करुनी ओवाळी बलवीरा ||२||

ओंजळ भरुनी आनंदाची सुखासवे नांदावे
उत्साहाचे सोनेरी क्षण अहर्निशी उजळावे
शरदासम चांदणे बरसुदे वाहो वसंतवारा||३||

दृष्ट न लागो मम कान्हाला वाढत राहो कीर्ती
मनी पाहिल्या स्वप्नांचीही सुखकर व्हावी पूर्ती
शतायुषी तू व्हावे हे मी विनवी जगदोद्धारा ||४||

तुझी आई
सौ.प्रज्ञा कुलकर्णी
#राज्ञी
दि-२३/८/२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 10 =