You are currently viewing सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा सुरू

सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा सुरू

27 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार महामार्गाची पाहणी

सकाळी ११.३० वा. खारेपाटण येथे होणार स्वागत

सिंधुदुर्ग जिल्हयाचे सुपूत्र व राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रविंद्र चव्हाण हे मुंबई – गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी कोकण दौर्‍यावर आले आहेत. शनिवारी ते सिंधुदुर्गमध्ये दौरा करणार आहेत. शुक्रवारी रायगड ते रत्नागिरीदरम्यान झालेल्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच त्यांनी महामार्गाच्या कामांची पाहणी करत गणेशोत्सवापूर्वी महामार्ग वाहतूकीला निर्धोक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच शनिवारी सकाळी ११.३० वाजता भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खारेपाटण येथे स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याला पनवेल येथून सुरूवात झाली. त्यानंतर रायगड, नागोठणे, वाकण फाटा खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदी ठिकाणी दौरा करून रत्नागिरीत आगमन झाले. याही ठिकाणी दौऱ्याला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. चिपळूण येथे आढावा बैठकही झाली.
शनिवार दि. २७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहरातून रस्त्याच्या कामाची पाहणी करत श्री. चव्हाण हे लांजा, राजापूर करून सिंधुदुर्गमध्ये दाखल होणार आहेत. खारेपाटणपासून रस्त्याच्या कामाची पाहणी करत दु. १ वा. ते कणकवलीत पोहोचणार आहेत. खारेपाटण येथे सकाळी ११.३० वाजता त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दु. १ ते ३ वा. पर्यंत कणकवलीत राखीव असून ३.३० वा. कुडाळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. यावेळी महामार्गाच्या कामांची पाहणी ते पाहणी करणार असून त्यानं सायंकाळी ४ वा. एमायडीसी विश्रामगृह कुडाळ येथे आढावा बैठक व पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४.४५ वा. झारा येथे आगमन होऊन ते रस्ताकामाची पाहणी करुन पुढे सावंतवाडीहून गोव्याकडे रवाना होणार आहेत.
श्री. चव्हाण यांच्या या दोन दिवशीय दौऱ्यात मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक निर्धोक होण्याच्यादृष्टीने सर्व पावले उचलण्यात येत आहेत. गणेशोत्सवानिमित येणारे चाकरमानी, वाहनचालकांना प्रवास सुखकर होण्याच्यादृष्टीने संबंधीत अधिकारी व ठेकेदार कंपन्यांना आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यात देण्यात येत आहेत. गणेशोत्सवापुर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची सर्व कामे तातडीने पुर्ण होत असल्याची माहिती श्री. तेली यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =