You are currently viewing मालवण महिला भाजपच्या वतीने मालवण तहसीलदार यांना निवेदन..

मालवण महिला भाजपच्या वतीने मालवण तहसीलदार यांना निवेदन..

मालवण

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सरकार मात्र आपल्यातील भांडणे मिटवून खुर्ची टिकविण्यात व्यस्त आहे.भाजपच्या वतीने आम्ही सरकारच्या या प्रवृत्तीचा विरोध करून जनआक्रोश व्यक्त करत आहोत. राज्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करून महिलांवरील अत्याचार थांबवावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मालवण तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.

महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांबाबत मालवण तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी मालवण तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार श्री. साईनाथ गोसावी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सौ. लक्ष्मी पेडणेकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. रश्मी लुडबे, जिल्हा परिषद महिला आणि बालविकास सभापती माधुरी बांदेकर, सौ. अन्वेशा आचरेकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, नगरसेविका ममता वराडकर, स्नेहल पराडकर, पूजा वेरलकर, समीक्षा खोबरेकर, अस्मिता काळसेकर, प्रेरणा गावडे, नमिता पाताडे, दिया हिंदळेकर, भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष दीपक पाटकर, युवा मोर्चा सरचिटणीस बाबा परब, मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे, नगरसेवक आप्पा लुडबे, गटनेते गणेश कुशे, जगदीश गावकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, अमोल हर्डीकर, जॉनी ब्रीटो आदीसह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवर, लहान मुली यांच्यावर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. यात सामान्य महिला वर्गाबरोबर कोरोना आपत्तीच्या काळात आरोग्य विषयक सेवा बजावणारे नर्स, डॉक्टर अशा महिलांवर देखील अतिप्रसंग घडताना दिसत आहेत. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असताना राज्य सरकारचे लक्ष मात्र या गोष्टीवर नसून आपल्यातील वैयक्तिक भांडणे मिटवून खुर्ची टिकवण्यामध्ये आहे.

मालवण तालुका भाजपच्या वतीने आम्ही या सरकारच्या प्रवृत्तीचा विरोध करून जनआक्रोश व्यक्त करत आहोत. सरकारने वेळीच जागे होऊन कायदा व सुव्यवस्था मजबूत करून महिलांवरील अत्याचार थांबवावेत. अन्यथा यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून लक्ष्मी पेडणेकर व महिलांनी सरकारला दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा