You are currently viewing प्रेमापोटी येणाऱ्या माणसांमुळेच नाम. दीपक केसरकरांच्या नागरी सत्काराला सोहळ्याचे स्वरूप..

प्रेमापोटी येणाऱ्या माणसांमुळेच नाम. दीपक केसरकरांच्या नागरी सत्काराला सोहळ्याचे स्वरूप..

*संवाद यात्रेत झालेली गर्दी ही देवगड, कणकवलीच्या लोकांचे सुंदरवाडी दर्शन..*

 

*मोती तलावाच्या काठावरून*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सावंतवाडी नगरीचे लाडके नेतृत्व, सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नाम.दीपक केसरकर यांचा भव्य नागरी सत्कार केंद्रीय कायदामंत्री म्हणून काम केलेले गोव्यातील नेते विधिज्ञ रमाकांत खलप व ही.हा.खेमसावंत भोसले यांच्या हस्ते शनिवारी सावंतवाडीतील ऐतिहासिक गांधी चौक येथे पार पडला. गांधी चौकाने आजपर्यंत अनेक सभा ऐकलेल्या आणि पाहिलेल्या आहेत. दिग्गज नेत्यांच्या सभा इथे ओतप्रोत भरलेल्या आणि “गर्वाचे घर खाली” या उक्तीप्रमाणे दिग्गजांना आसमान दाखवतानाही पाहिल्या आहेत. कित्येकांना याच गांधी चौकाने राजकारणात तारलं तर काहींना राजकारण सोडायला भाग पाडलंय. गांधी चौकात सभेला झालेली गर्दी पाहून लोक राजकीय भविष्य वर्तवायचे…!

शिवसेनेचे सावंतवाडीतील आमदार केसरकरांनी शिंदेंगटाची कास धरल्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून त्यांच्यावर आगपाखड करण्यात आली. सावंतवाडी मतदारसंघ वगळता कुडाळ, कणकवली, मालवण आणि चक्क देवगड वरून कार्यकर्ते आणून सावंतवाडीत केसरकर यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. “जे करताय ते योग्य नाही…..” अशी समज एका सहकारी नेत्याला मिळताच, त्याने केसरकर यांच्या घरासमोरून जाणाऱ्या मोर्चात सामील होणे देखील टाळले होते अशी माहिती देखील समोर आली होती. परंतु केसरकरांच्या विरोधात जे काही गेली दोन अडीज वर्षे जिल्ह्यातील संघटनेत शिजत होतं त्याचा प्रत्यय केसरकरांच्या विरोधात सावंतवाडीत दिल्या गेलेल्या घोषणांमधून आला होता. अतिशय खालच्या तळाला उतरत काहींनी केसरकरांचे चारित्र्य हनन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड येथील माणसे आणून सावंतवाडीत गद्दार अशी केसरकरांची अवहेलना केली गेली होती. त्याचीच भरपाई मतदारसंघातील जनतेने केसरकरांवर आपले असलेले प्रेम दाखवून करून दिली.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सावंतवाडीतील संवाद यात्रेच्या सभेसाठी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी “ही सभा न भूतो न भविष्यती होणार” अशा वल्गना केल्या होत्या. कणकवलीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करत अडीज वर्षांपूर्वी शिवसेनेत आलेले युवा नेतृत्व संदेश पारकर यांनी आपली ताकद लावून देवगड येथील माणसे सावंतवाडीतील संवाद यात्रेच्या सभेसाठी आणली. कुडाळ पासून देवगडपर्यंतची माणसे आणून सावंतवाडीत हजाराची गर्दी झाल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्यामुळे कुडाळ, कणकवली, देवगड येथे असलेली वैभव नाईक, संदेश पारकर यांची ताकद दिसून आली. परंतु आदित्य ठाकरेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला केसरकरांनी केलेल्या सूचक विधानाची काहीशी गंभीरता लक्षात घेऊन केसरकरांचे नाव घेण्याचे सभेत टाळले, त्यामुळे सभेचा रंग काहीसा फिका पडला. सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना मात्र सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग मतदारसंघातून संवाद यात्रेसाठी केसरकरांच्या विरोधात आदित्य ठाकरेंच्या सभेला मतदार जमविणे शक्य झाले नाही, केवळ संदेश पारकर यांनी देवगड येथून आणलेल्या लोकांमुळे सभा भरल्याचे चित्र दिसून आले. परंतु सावंतवाडीतील उमेदवाराच्या विरोधात इतर मतदारसंघातून माणसे जमवून काही फरक पडतो का? याचे उत्तर नाम.दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीच्या गांधी चौकात झालेल्या नागरी सत्काराच्या सभेला झालेल्या गर्दीनेच दिले.

सावंतवाडीत येऊन सावंतवाडीच्या सुपुत्राच्या विरोधात अनेकवेळा घोषणाबाजी, टीकाटिप्पणी झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे शांत, सुसंस्कृत, सुशिक्षित असणाऱ्या सावंतवाडीच्या जनतेने वेळोवेळी दिलेले आहेच. नाम.दीपक केसरकरांच्या विरोधात राळ उठवून अनेकांनी त्यांना उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले परंतु त्या त्या वेळी दीपक केसरकर यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत विजय संपादन केल्याचे उदाहरण आहेच. वेंगुर्ला राड्या नंतर दीपक केसरकर यांनी तर विरोधकांना नगरपालिका निवडणुकीत १७/० अशी धूळ चारली होती. दिवस बदलले, राजकारणात पैशांचा वारेमाप वापर सुरू झाला परंतु जनता आजही तीच आहे हे देखील विसरून चालणार नाही. नाम.केसरकरांच्या नागरी सत्काराच्या समितीचे अध्यक्ष हे राजकीय चेहरा नसलेले विधिज्ञ सुभाष पणदूरकर होते, तरीही मोठमोठी आवाहने न करता, मतदारांना आमिषे न दाखवता, केवळ नाम.केसरकरांवर प्रेम म्हणून गर्दी जमणे आणि स्वतःच्या मतदारसंघातील जनतेने सत्कार करणे हे केवढं मोठं भाग्य…..!

सावंतवाडी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांना कालच्या सत्कार सभेतील गर्दी नक्कीच नाम.केसरकर चूक की बरोबर हे समजण्यासाठी आणि बोध घेण्यासाठी पुरेशी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही….!

प्रतिक्रिया व्यक्त करा